आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Delhi Guwahati Rajdhani Derailed Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: राजधानी घसरली, 4 ठार-8 जखमी, घातपाताची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना - नवी दिल्लीहून डिब्रूगढला जाणारी नवी दिल्ली-डिब्रूगढ राजधानी एक्सप्रेस (12236) छपराच्या जवळ पटरीवरून घसरल्याने झालेल्या अपघातात 4 प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर 8 प्रवासी जखमी आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी छपरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेलवे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्र कुमार यांनी या घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवली आहे. नक्षल्यांनी या भागात बंद पुकारलेला होता. त्यामुळे या घातपातामागे नक्षलवाद्यांचा हात असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, रेल्वेमंत्री सदानंद गौडा आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा पाटणा येथे दाखल झाले आहेत.

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात रात्री 2 वाजून 7 मिनिटांनी छपरा-गोलडनगंज स्थानकाच्या दरम्यान झाला. या अपघातात रेल्वेचे 9 डबे रूळावरून घसरले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. घटनास्थळी सुमारे 500 मीटरचे रुळ बाहेर आले आहेत. परंतु, स्फोट घडवून आणून रुळ बाहेर आल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले, की या अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, रेल्वेने वैद्यकीय मदतीसाठी एक पथक घटनास्थळी रवाना केले आहे. रेल्वे मंत्रालयाने मृतांच्या नातेवाईकाला दोन लाख रुपये, गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 20 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

रूळावरून घसलेल्या बोगींमध्ये बी-1 ते बी-7 यांचा समावेश आहे. तसेच 1 पँट्री आणि एक स्लीपर बोगीही घसरली आहे. दरम्यान या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून सायंकाळपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे.
गोल्डन गंज स्टेशनपासून सुमारे 60 किलोमीटर दूर असलेल्या मालगाडीचे डबेही घसरले आहेत. या गाडीचे एकूण 18 डबे रुळांवरून घसरले आहेत.

रेल्वे विभागाने अपघाताची माहिती मिळण्यासाठी 06279-6510, 06224-2226778 हे दोन हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.

पुढे पाहा - अपघातानंतरची काही छायाचित्रे
जाणून घ्या, 2000 पासून घडलेल्या 27 मोठ्या रेल्वे दुर्घटना, पुढील स्लाईडवर
(रुळावरून घसरलेले नवी दिल्ली-डिब्रूगढ राजधानी एक्सप्रेसचे डबे)