आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केरळ : मतदारांना आकर्षित करण्यासाठी लकी ड्रॉ, बक्षिसे आणि फ्लॅश मॉबचे फंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पथनमथिट्टा - निवडणुकीच्या काळात मतदारांना भेट स्वरूपात वस्तू देणे सामान्य परिस्थितीत आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाते, पण केरळच्या पथनमथिट्टा जिल्हा प्रशासनाने मात्र मतदारांना मतदान केंद्रापर्यंत खेचून आणण्यासाठी त्यांना आकर्षक बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमधील सरासरीपेक्षा कमी मतदान झाल्याने प्रशासनाने बक्षिसे देण्याची तसेच त्यासाठी लकी ड्रॉ काढण्याची शक्कल लढवली आहे.

२०११ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी केरळमध्ये सरासरी ७५.१२ टक्के मतदान झाले होते. पथनमथिट्टा जिल्ह्यात मात्र ६८.२२ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही अशीच स्थिती होती. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. हरिकिशोर यांनी या वेळी मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.

‘मतदान करा आणि जिंका’ स्पर्धा
गेल्या दोन निवडणुकांत ज्या मतदान केंद्रांवर कमी मतदान झाले तेथील १०० निवडक मतदान केंद्रांवर ‘मतदान करा आणि जिंका’ ही स्पर्धा आयोजित केली जाईल. मतदान केल्यानंतर मतदारांना ‘थँक यू’ कार्ड दिले जाईल. त्यावर एक विशिष्ट क्रमांक असेल. एकूण एक लाख कार्ड वितरित केले जातील. या एक लाख कार्डसाठी लकी ड्रॉ काढला जाईल आणि विजेत्यांना ‘आकर्षक’ बक्षिसे दिली जातील. त्यासाठी वस्त्रदालने आणि ज्वेलर्सशी संपर्क साधण्यात येत आहे.

नवमतदारांसाठी फ्लॅश मॉब
जिल्ह्यात १८ हजार नवीन मतदार अाहेत. त्यांनी मतदानासाठी यावे यासाठी महाविद्यालयांमध्ये फ्लॅश मॉबचे आयोजन केले जाईल. एक शॉर्ट फिल्म तयार करण्यात येईल आणि सिनेमागृह तसेच टीव्ही चॅनेलवर ती दाखवली जाईल. पंचायत आणि महसूल कार्यालयांत जाणारे लोक ‘व्होटर्स वॉल’वर स्वाक्षरी करू शकतील. सोशल मिडियाचाही वापर केला जाईल.
बातम्या आणखी आहेत...