आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादमधील अमीरपेट बनलेय IT ट्रेनिंग हब, 500 इन्स्टिट्यूटमध्ये 1 लाख विद्यार्थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमीरपेटमधील अभ्यासक्रम स्वस्त तर आहेतच, शिवाय करिअरनुसार ते अपडेटही केलेले असतात. - Divya Marathi
अमीरपेटमधील अभ्यासक्रम स्वस्त तर आहेतच, शिवाय करिअरनुसार ते अपडेटही केलेले असतात.
अमीरपेट (हैदराबाद) येथून सोबत द इकॉनॉमिस्टचे इनपूट  - सकाळचे साडेसात वाजलेले. गर्दी सतत वाढत आहे. छोट्या-छोट्या खोल्यांत वर्ग सुरू झाले आहेत. जावा कोडिंगपासून ते क्लाऊड हँडलिंगपर्यंत, येथे शेकडो प्रकारचे अभ्यासक्रम केले जात आहेत. तीन ते सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमाचे शुल्क २५ हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. हे आहे अमीरपेट... देशाचे अनधिकृत माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रस्थान (आयटी ट्रेनिंग हब). येथील ५०० पेक्षा जास्त संस्थांत रोज एक लाख विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी येतात हे माहीत झाल्यानंतर आश्चर्यचकित व्हाल.  
 
हैदराबादच्या अमीरपेटला ‘अनधिकृत आयटी हब’ म्हणण्याची काही कारणे आहेत. तुम्ही तेथे पोहोचल्यावर मोठमोठ्या आणि उंच इमारती तुमचे स्वागत करतात. या इमारतींवर लावलेले फलक आणि पोस्टर्स पुढील कथा स्वत:च सांगतात. जागा रिकामी आहे आणि तेथे होर्डिंग लावलेले नाही, अशी जागा कोणत्याही इमारतीत मिळणार नाही. सकाळी साडेसात वाजताच विद्यार्थी येण्यास सुरुवात होते. हा प्रकार रात्रीपर्यंत सुरू असतो. हेच चित्र पूर्ण दिवसभर, महिनाभर आणि वर्षभर असते. दिवसभरात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी येतात. या संस्था भलेही छोट्या असल्या तरी येथे प्रत्येक प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तुम्ही तेथे पोहोचलात की समुपदेशक लगेच अभ्यासक्रमाची माहिती देतात. येथे फक्त हैदराबादचेच नाही, तर इतर राज्यांतीलही विद्यार्थी कोचिंगसाठी येतात.  
 
बिहारमधून आलेले नितीन यांनी सांगितले की, अमीरपेटमधील अभ्यासक्रम स्वस्त तर आहेतच, शिवाय करिअरनुसार ते अपडेटही केलेले असतात. त्यामुळेच मी अमीरपेटची निवड केली. उत्तर प्रदेशमधील विनय यांनी सांगितले की, मित्राकडूनच मला अमीरपेटची माहिती मिळाली. त्यानंतर मी येथे आलो. अमीरपेटमधील अनेक कोचिंग सेंटर तर प्लेसमेंट देण्याचा दावाही करतात. अर्थात, आयटी उद्योगात ज्या वेगाने कंपन्या प्रगती करत आहेत त्याच वेगाने तंत्रज्ञानही बदलत आहे. सॉफ्टवेअर प्रोग्राम अपग्रेड केले जातात किंवा संपवले जातात. इन्फोसिस आणि विप्रो या देशातील आऊटसोर्सिंगच्या दिग्गज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अपग्रेड ठेवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल सविस्तर चर्चा करतात. ज्यांना नोकरी बदलायची असते किंवा लवकर बढती मिळवण्यासाठी योग्यता वाढवायची असते, ते नोकरपेशा लोकही येथे येतात. पायरेटेड साॅफ्टवेअर वापरले जात असल्याने अभ्यासक्रम स्वस्त आहेत.  कधी-कधी छापेही पडतात. छाप्यांची माहिती मिळताच येथील संस्थाचालक सर्व्हर रिकामे करून घेतात. छापा पथक परतले की पुन्हा रिइन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होते. येथे जेवढ्या वेगाने अभ्यासक्रम अपडेट होतात, तेवढ्या वेगाने देशातील प्रख्यात महाविद्यालयांतही होत नाहीत.
 
विद्यार्थी या कारणांमुळे करतात अमीरपेटची निवड
सर्वात लवकर अपडेट
अमीरपेटमध्ये सर्वात आधी अभ्यासक्रम अपडेट होतात. आयटी क्षेत्रात सॉफ्टवेअर प्रोग्राम वेगाने बदलतात.अमीरपेटच्या संस्था सर्वात आधी अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करतात.
सर्वात स्वस्त शुल्क
देशात इतर ठिकाणी ज्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सुमारे पावणेचार लाख रुपयांपर्यंत शुल्क असते, ते येथे २५ हजारांपेक्षाही कमी शुल्कात उपलब्ध आहेत. पायरेटेड सॉफ्टवेअर वापरले जात असल्यानेही शुल्क कमी आहे.
 
इतर ठिकाणी अमीरपेटपेक्षा १५ पट जास्त शुल्क
वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळे शुल्क. सामान्यपणे येथे शुल्क १२०० रुपयांपासून सुरू होते. ३ ते ६ महिन्यांच्या अनेक कोर्ससाठी २५ हजारांपर्यंत शुल्क घेतात. इतरांच्या तुलनेत हे खूपच कमी आहे. देशातील इतर शहरांत हेच शुल्क सुमारे १५ पट महाग आहे. विशेष म्हणजे हैदराबाद राहण्याच्या दृष्टीनेही स्वस्त आहे.
 
बेसिकपासून अॅडव्हान्सपर्यंतचे विविध अभ्यासक्रम
पायाभूत शिक्षणापासून ते अॅडव्हान्स पातळीपर्यंत संगणक अभ्यासक्रम उपलब्ध. ऑटो कॅड २ डी/३ डी, ऑटो कॅड सिव्हिल स्पेशलायझेशन, मेकॅनिकल स्पेशलायझेशन, ई कॅड, एमएस प्रोजेक्ट, प्रो इंजिनिअर, युनी ग्राफिक्स, हायपरमॅश आणि अॅनसिसचा त्यातसमावेश. आंध्र प्रदेशातील बहुतांश युवकांची पसंती अभियांत्रिकीला आहे.
 
महाविद्यालयांत तुम्हाला फक्त पदवी मिळते. अमीरपेटमध्ये खरे शिक्षण मिळते.
 
नरसिंहम पेरी, ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठातील संशोधक.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...