आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंक्य ज्योतीपुढे दु:ख झाले पराजित!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिकानेर (राजस्थान)- ज्योती नावाची ही महिला आहे. त्यांच्या आवाजात एक खनक आहे. मात्र यात एक अतीव दु:ख लपले आहे. फार कमी लोकांना ते माहीत आहे. राजस्थानमध्ये २० वर्षांपासून स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी त्या स्टेजवर सूत्रसंचालन करतात. अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी त्यांना बोलावले जाते. त्या प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण नाहीत. दु:ख त्यांचा पिच्छा पुरवत आहे. डॉ. ज्योती जोशी मूळच्या भिलवाडा येथील आहेत. जयपूरच्या शिक्षण विभागात समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विवाह झाल्यानंतर एका महिन्यातच त्यांच्या एकुलत्या एक छोट्या भावाचा ब्रेन ट्यूमरने मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंब शोकमग्न होते.

ज्योती आतून कोलमडल्या होत्या. मात्र प्रयत्नपूर्वक त्यांनी स्वत:ला सावरले. भावाला गमावले. मात्र मुलांच्या हास्याकडे पाहून त्यांनी स्वत:ची समजूत काढली. मातृत्व लाभल्यावर त्यांचे आयुष्य पूर्वपदावर आले. मात्र तितक्यात पतीच्या अपघाती मृत्यूची वार्ता कानी पडली. त्यांचे पती वैज्ञानिक होते. त्यांच्या आयुष्यातील दु:खाचे सत्र इथेच थांबले नाही. स्टेजवर सूत्रसंचालन करत त्या स्वत:ला व्यग्र ठेवत. पतिनिधनाचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करत राहिल्या.  दु:खापुढे झुकल्या नाहीत. त्यांच्यावर आणखी एक वज्राघात झाला वर्ष २००७ मध्ये. १६ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाला. यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात कमालीची विषण्णता आली. मुलगा गमावल्यानंतर एका महिन्यातच त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे संचालन केले. कुटुंबातील इतक्या लोकांना गमावल्यावरही दु:ख त्यांना हरवू शकले नव्हते. त्यात त्यांना कर्करोग झाला. शस्त्रक्रिया झाली आहे. 

एकीकडे उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे व्यासपीठावरून सूत्रसंचालनाचाही धडाका सुरू आहे. ज्योतीचे वडील विद्यापीठात प्रोफेसर होते. उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल. जोशींचे ते नातलग आहेत. त्यांची एकुलती एक बहीण संध्या मध्य प्रदेशच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत आहे. ज्योती सांगतात की, माझ्या मुलीचे करिअर घडवण्यासाठी संध्याने विवाह केला नाही. ज्योती सभागृहातील वातावरण मुग्ध करण्यात पारंगत आहेत. सभागृह, क्रीडासंकुल  किंवा इतर कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट असतो. ज्योती गेल्या दशकभरापासून राजस्थानमधील विविध कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करतात. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे सूत्रसंचालनही त्यांनी जोधपूर येथे नुकतेच केले. 

ज्योती यांना अडीच वर्षांपूर्वी आपल्या आजाराविषयी कळाले. मात्र त्यांनी कार्यक्रम टाळले नाहीत. काही दिवसांपूर्वी ‘पिघला हुआ मन’ नावाचा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीच सिंहस्थात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्योती कर्करुग्णांसाठी समुपदेशनाचे कामही करतात. धैर्याने आजाराशी झुंज देण्याची प्रेरणा देतात. त्या सांगतात- सर्वकाही ईश्वराच्या हातात आहे. जीवन सार्थकी लावण्यासाठी कर्म करत राहा. कर्करुग्णांना संदेश देताना त्या म्हणतात की या आजाराला सामान्य आजारांप्रमाणेच स्वीकारा. मनात हिंमत ठेवून याचा सामना करा. 
बातम्या आणखी आहेत...