आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनडीआरआय करणार हिरव्या चाऱ्याची टंचाई दूर, चाऱ्याचे सदाबहार वाण येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करनाल - नॅशलन डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (एनडीआरआय) देशात चाऱ्याची टंचाई दूर करण्यासाठी फॉरेज म्युझियम (चारा संग्रहालय) तयार केले आहे. यात विविध प्रकारच्या जवळपास तीन डझन जाती विकसित केल्या आहेत. त्यात एकदा लागवड केल्यास तीन वर्षांपेक्षा जास्त काळ चारा उत्पादन घेता येणार आहे.
या माध्यमातून हिरव्या चाऱ्याचे बीज व गवताच्या पट्ट्या तयार करण्यात येत आहेत. चाऱ्याचे हे वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या वाणांद्वारे चारा उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक मोसमात हिरवा चारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देशातील दूध उत्पादनातही वाढ होणार आहे. एनडीआरआयचे संचालक ए. के. श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधक डॉ. बी. एस. मीणा यांनी देशभरातून हिरव्या चाऱ्याची बहुवर्षीय बीजे विकसित करण्याचे काम केले आहे. पुढील वर्षभरात शेतकरी व पशुपालकांना चारा पट्ट्यांचे वाण व तीन वर्षे चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी बीज उपलब्ध होणार आहे.
देशात ३६ टक्के चारा टंचाई
देशात पशुधनासाठी सध्या ३६ टक्के हिरव्या चाऱ्याची टंचाई आहे. शेतजमिनी कमी होत असल्याने सध्या केवळ ४ टक्केच चारा उत्पादन होत आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार देशातील एकूण शेतजमिनीमध्ये ८ टक्के जमिनीवर हिरवा चारा उत्पादित होणे आवश्यक आहे. तरच चाऱ्याची एकूण गरज पूर्ण होऊ शकेल. या दृष्टिकोनातून संशोधकांनी एकदा लागवड केल्यास सलग तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उत्पन्न देणारे चारा वाण विकसित केले आहे. ते पशुपालक शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल.
हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे नुकसान
भारतात दरवर्षी १४० दशलक्ष टन दूध उत्पादन होते. त्याबाबत देश जगात क्रमांक एकवर आहे. परंतु आपल्याकडील जनावरांची दूध देण्याची क्षमता विदेशी जनावरांच्या तुलनेत ५० टक्के कमी आहे. त्यामुळे आपल्याला दूध उत्पादन वाढवावे लागेल. त्यासाठी उत्तम जातीच्या हिरव्या चाऱ्याची टंचाई दूर करून त्याचे उत्पादनही वाढवावे लागेल.