आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम जन्मभूमीवर भव्य मंदिर व्हावे, मुस्लिमबहुल भागात मशीद; अयोध्या वादावर नवा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयाेध्या/अलाहाबाद- अखिल भारतीय आखाडा परिषदेने सोमवारी उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डासोबत मिळून अयोध्या वादावर नवा प्रस्ताव तयार केला. पाच डिसेंबरपूर्वी तो सुप्रीम काेर्टात सादर हाेणार आहे.  प्रस्तावानुसार, राम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारले पाहिजे. तसेच वादग्रस्त वास्तूच्या दूर मुस्लिमबहुल भागात मशीद-ए-अमनची उभारणी व्हावी. 

शिया बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सांगितले की, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी, हनुमानगढीचे महंत धर्मदास, श्रीराम जन्मभूमी न्यासचे वरिष्ठ सदस्य आणि दिगंबर आखाड्याचे महंत सुरेश दास, महंत रामकुमार दास यांच्यासोबत हा समझोता प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ते याबाबतीत अयाेध्येच्या अनेक संत-धर्मांचार्यांना भेटले आहेत. हा प्रस्ताव विधिज्ञांना दाखवून सर्वाेच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. रिझवी म्हणाले, या वादाशी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे काहीही देणेघेणे नाही. यामुळे समझोत्यात त्यांचे काहीही स्वारस्य नाही. हे लोक फक्त माध्यमांत चर्चेत राहण्यास इच्छुक आहेत. 
 
वारसांनी प्रस्ताव नाकारला
बाबरी मशिदीचे मुद्दई दिवंगत हाजी मोहंमद हाशिम अन्सारी यांचे उत्तराधिकारी मोहंमद इक्बाल यांनी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांचा मंदिर-मशीद समझोत्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, रिझवी शिया व सुन्नी समुदायात तेढ निर्माण करण्यासाठी हा प्रस्ताव घेऊन आले आहेत. मशिदीची देखभाल सुन्नी समुदायाच्या लोकांनीच केली आहे.
 
गुरुवारी अयोध्येत चर्चा
राम मंदिर वादात स्वत:च्या इच्छाशक्तीतून मध्यस्थी करत असल्याचे अाध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. या प्रकरणात सर्व संबंधितांशी चर्चा करण्यासाठी १६ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याचे रविशंकर यांनी सांगितले. काँग्रेसने गेल्या महिन्यात रविशंकर यांना सरकारचे एजंट असल्याचे म्हटले होते.  

जेएनयूमध्ये भाषणात रविशंकर म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सद््भावना भेट घेणार आहोत. अयाेध्या भेटीमागे कोणताही अजेंडा नाही. या दाैऱ्यात प्रत्येकाचे ऐकून घेईन. राम मंदिर वादाचा निवाडा न्यायालयाबाहेर केला जावा.
बातम्या आणखी आहेत...