आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या दौऱ्याआधीच जदयू-भाजपात संघर्ष, जदयूने मोदींचे पोस्टर्स फाडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ पाटणा- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु राजकीय पक्षांमध्ये निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गया येथे एका रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून ते राज्यातील नितीशकुमार सरकारवर हल्लाबोल चढवण्याची शक्यता आहे. या रॅलीसाठी शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरवरून वाद पेटला आहे. जदयूच्या कार्यकर्त्यांनी रॅलीचे पोस्टर फाडून टाकल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही दिल्लीमध्ये बिहार फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून या संघर्षात भर टाकली.
नितीशकुमार यांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या २० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. नितीशकुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत भाजप पदाधिकाऱ्यांनी भागलपूर दंगलीतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान गया शहरात लावलले मोदींचे पोस्टर काढून टाकून तेथे नितीशकुमारांचे पोस्टर लावण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावर "आम्ही आता धोका सहन करणार नाही व नितीशकुमारांनाच विजयी करू' असे स्लोगन आहेत. नितीशकुमारांचे पोस्टर काढून भाजपनेच मोदींचे पोस्टर लावल्याचा आरोप जदयूने केला आहे. जिल्हाधिकारी संजयकुमार अग्रवाल यांनी पोस्टर वादात दोन तक्रारी मिळाल्याचे सांगितले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गया येथे रॅलीच्या ठिकाणी लावण्यात आलेले अनेक पोस्टर फाडून टाकण्यात आलेले आहेत. हे कृत्य कुणी केले याचा शोध घेतला जात आहे.
बिहारमध्ये बुधवारी परिवर्तन यात्रा
बिहार विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.‘परिवर्तन यात्रे’च्या निमित्ताने राज्यात निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. पक्षाचे २०० रथ राज्यभरात फिरून प्रचार करतील, असे भाजपने शनिवारी स्पष्ट केले. भाजप आणि रालोआ यांची आघाडी झाल्यापासूनच बिहारमध्ये परिवर्तनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी २०० रथांना हिरवा कंदील दाखवला होता. आता राज्यात प्रचाराला गती आली आहे, अशी माहिती केंद्रीय खत व रसायन मंत्री अनंत कुमार यांनी दिली. अनंत कुमार हे बिहारचे पक्ष प्रभारी आहेत. १२ ऑगस्टपासून यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
२८ ऑगस्टपर्यंत त्या गावागावात पोहचतील. राज्यातील २४३ मतदारसंघात रथ पोहचेल. आमची प्रचार मोहिम सकारात्मक आहे. त्याद्वारे आम्ही विकास, कृषी, रोजगाराचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सोनेपूर येथून पहिली यात्रा सुरू करण्यात येईल. त्याला सुशील कुमार मोदी यांची उपस्थिती असेल. दुसरी यात्रा बेगुसराय-भागलपूर मतदारसंघात काढण्यात येईल. तिसऱ्या यात्रेचे नेतृत्व कृषी मंत्री राधा मोहन सिंह तर चौथ्या यात्रेचे नेतृत्व गिरीराज सिंह करतील.