आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने बिहारमध्ये तिकिटे विकली! स्वकीयाकडून हल्ल्याची नामुष्की

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा / नवी दिल्ली- बिहारमधील विधानसभा निवडणुकीत विरोधक परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु शनिवारी भाजपला मात्र घरचा आहेर मिळाला. निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी पक्षाकडून तिकीट विक्री केली जात आहे. पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते किंवा आमदारांना डावलून सपशेल गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली जात अाहे, असा आरोप भाजपचे खासदार आर.के. सिंह यांनी केला.

भाजप लालू यादवांना जंगल राज म्हणून लक्ष्य करते. परंतु अशा प्रकारे पैसे घेऊन तिकिटे दिली जात असल्याने लालूंवर टीका करण्याला काहीही अर्थ राहत नाही. गुन्हेगारांना तिकीट देण्यात आले आहे. हा बिहारच्या जनतेवरील अन्याय आहे. काही लोकांनी तिकिटे विकली. हे काय चाललेय ? मग आपण चांगले प्रशासन कसे देणार ? तुम्ही गुन्हेगारांना तिकिटे दिली आहेत. मग तुम्ही बिहारमध्ये स्वच्छ प्रशासन कसे देणार आहात? गुन्हेगारांना उमेदवारी का देण्यात आली आहे.
कारवाई नाही
सिंह यांनी स्वपक्षावरच हल्लाबोल केला असला तरी भाजप त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर काही कारवाई होईल असे दिसत नाही. सिंह हे अरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

तिकीटवाटप योग्य पद्धतीने : राजनाथ
भाजपमध्ये तिकीटवाटप होते त्या वेळी सर्व गोष्टींचा विचार करूनच उमेदवारी दिली जाते. बिहारचा विचार केल्यास भाजपच्या नेतृत्वाखालील रालाेआ राज्यात बहुमताने विजयी होईल. बिहारी जनतेच्या पाठिंब्यावर हा विजय अवलंबून आहे, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही हा आरोप फेटाळला. वरिष्ठ नेत्यांशी पारदर्शक चर्चेनंतरच पक्षात तिकीटवाटप केले जाते, असे प्रसाद म्हणाले.
तेजस्वीपासून लालूंचा प्रचाराचा प्रारंभ
राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला धाकटा मुलगा तेजस्वीच्या मतदारसंघातून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ सप्टेंबरला राघोपूरच्या तेरसियामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. लालूंचे राघोपूरशी जुनेच नाते आहे. त्यांची पत्नी तथा माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनीदेखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.
...तर पार्टीचे आदेश नाही जुमानणार : आर.के .सिंह
पक्षाने गुन्हेगारांना तिकिटे देण्यापेक्षा स्वच्छ प्रतिमा असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्यास राज्यात पक्षाला चांगला विजय मिळू शकेल. परंतु माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकिटे दिल्यास अरा मतदारसंघात प्रचार करणार नाही. पक्षाचे आदेश असले तरी जुमानणार नाही, असा पवित्रा खासदार आर.के. सिंह यांनी घेतला आहे.
नितीशकुमार यांना हार्दिक सहकार्य करणार
पटेल नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांना सहकार्य करण्याची घोषणा केली आहे. झारखंडी संस्कृती तथा कला विकास मंचचे संयोजक सुखदेव महतो यांच्या आमंत्रणावरून जमशेदपूर येथे शनिवारी ते आले होते. नितीश त्यांच्या समुदायाचे आहेत आणि चांगले मुख्यमंत्री आहे. म्हणूनच त्यांच्या बाजूने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.