आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला दणका, बिहारमध्ये सेना स्वबळावर, १५० जागा लढवण्याची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा येथे शिवसेना नेते संजय राऊत यांचा शिवसैनिकांच्या वतीने असा सत्कार झाला. - Divya Marathi
पाटणा येथे शिवसेना नेते संजय राऊत यांचा शिवसैनिकांच्या वतीने असा सत्कार झाला.
पाटणा- महाराष्ट्रात भाजपशी युती करून सत्तेत असतानाही या ना त्या कारणाने आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेने आता थेट बिहार विधानसभेचे रण गाठले आहे. या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर १५० जागा लढवत असून यामुळे भाजप-सेनेच्या मैत्रीतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये बिहारींवर सातत्याने हल्ले केल्याचा आरोप असलेल्या शिवसेना नेत्यांनी हा आरोप मात्र फेटाळला आहे. महाराष्ट्रात मतदारांचे पाठबळ असल्याचा दावा करून आता उत्तर भारतात आपली शक्ती वाढवण्यासाठी बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर उतरत असल्याचे या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. या राज्यात नितीशकुमार प्रणित महाआघाडीने टाकलेल्या जाळ्यात भाजप व मित्रपक्ष अडकून पडल्याने आपल्या पक्षाने स्वबळावर या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे नेत्यांनी म्हटले आहे.

बिहार विधानसभेसाठी भाजपप्रणित आघाडीत शिवसेना का सहभागी झाला नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा पक्षप्रवक्ते संजय राऊत म्हणाले, हिंदी भागात सेनेला आपली शक्ती वाढवायची आहे. या राज्यातील जनतेचे सक्षमीकरण हाच पक्षाचा अजेंडा आहे.

विकासाच्या नावाने फसवेगिरी
गेल्या २५ वर्षांपासून लालू-नितीश यांनी बिहारवर राज्य केले आहे. मात्र, राज्याचा ख ऱ्या अर्थाने विकासच होऊ शकला नाही. या राज्यातील जनता हुशार, कुशल आणि कष्टकरी असतानाही रोजगाराअभावी मुंबईसह इतर राज्यांत स्थलांतरित होत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
मुंबईसह महाराष्ट्रात शिवसैनिक बिहारींवर अत्याचार करत असल्याचे बोलले जाते. याबद्दल राऊत म्हणाले, एखाद्या बिहारी व्यक्तीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्याने अन्याय किंवा अत्याचार केल्याचे एकही उदाहरण नाही. उलट बिहारी राजकारणीच विनाकारण अशा अफवा राज्यात कायम पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. बिहारमधील काही नेत्यांना आपल्या राज्यात काय जळते आहे यापेक्षा मंुबईत काय घडते आहे याबद्दलच अधिक रस आहे. मग बिहारींवर कसा अन्याय होतो आहे याच्या सुरस कथा ऐकवायला हे नेते मोकळे होतात. या कुटाण्यात पडण्यापेक्षा बिहारी नेत्यांनी राज्यातील जनतेचे स्थलांतर थाबवण्यासाठी व त्यांचे पोट भरण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

भाजपची तिसरी यादी
भाजपने रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीतील आपल्या अकरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. आतापर्यंत १६० जागांपैकी १५३ जागांवरील उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत.

स्वबळावरच लढणार
बिहारमध्ये शिवसेना स्वबळावर १५० जागा लढवणार आहे. अर्थातच हिंदुत्व हाच शिवसेनेचा प्रमुख अजेंडा असेल. याशिवाय गरिबी निर्मूलन, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही पक्षाचा भर असणार आहे. संजय राऊत, प्रवक्ते, शिवसेना

भाजपशी हातमिळवणी नाही : ओवेसी
बिहार निवडणुकीत एआयएमआयएमला भाजपनेच मैदानात उतरवले असल्याच्या आरोपाचा पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. मुळात जदयूच्या नेतृत्वाखालील महाआघाडीकडे आता बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाही. त्यामुळे असे पोकळ आरोप केले जात असल्याचे सांगून आपला पक्ष केवळ सीमांचल भागातच उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.