आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतपत्रिकांचा वापर होऊनही बसपची सुमार कामगिरी; उ. प्र.च्या पालिका निवडणुकीती झाले स्पष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जेथे मतपत्रिकांचा वापर झाला तेथेही बहुजन समाज पक्षाने सुमार कामगिरी केल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे आमच्या पक्षाचा पराभव झाला असे म्हणत बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्याचे समर्थन केले होते, हे विशेष.  


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील निकालांनुसार, बसपने महापौरपदाच्या सर्व १६ जागा लढवल्या आणि त्यापैकी अलिगड व मेरठ या दोन जागा जिंकल्या. पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम ११ ठिकाणी जप्त झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मतदान झाले होते. तीत बसपच्या ६८.७ टक्के उमेदवारांना अनामत रक्कम गमावावी लागली होती. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे मतदान झाले होते. १८६ नगरपालिकांच्या जागांपैकी १३१ ठिकाणी (७०.४३ टक्के) बसपच्या उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. त्याचप्रमाणे नगरपंचायत अध्यक्षांच्या निवडणुकीत बसपने ३५७ जागा लढवल्या. त्यापैकी २६८ ठिकाणी (७५ टक्के) पक्षाच्या उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली.  


स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मायावती यांनी पत्रकार परिषद घेतली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर केला तर भाजपचा पराभव होईल, असा दावा त्यांनी केला होता. सपानेही आपल्या सुमार कामगिरीसाठी ईव्हीएमवरच ठपका ठेवला होता. मायावती यांच्या आरोपाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले होते. मायावती यांनी आपल्या दोन्ही महापौरांना राजीनामा देण्यास सांगावे आणि मतपत्रिकांचा वापर करून पुन्हा ही निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले होते. मतपत्रिकांचा वापर झालेल्या ठिकाणी समाजवादी पार्टीचीही कामगिरी सुमार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...