आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृणमूल खासदारांच्या अटकेवरून प्रदेश-केंद्रीय नेतृत्वात मतभेद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - रोझ व्हॅली चिटफंड घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राज्यात ज्यांना अटक केली आहे, त्यांनी ‘जनतेचा पैसा लुटला होता,’ अशी भूमिका पश्चिम बंगाल काँग्रेसने सोमवारी मांडली. याउलट नोटाबंदीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या विरोधकांची एकी फोडण्यासाठी ‘सुडाच्या राजकारणातून’ तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना अटक करण्यात आली आहे, अशी टिप्पणी केंद्रीय नेतृत्वाने केली होती. त्यावरून या मुद्द्यावर राज्य आणि केंद्रीय नेतृत्वात मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेतील काँग्रेसचे नेते अब्दुल मन्नान म्हणाले की, ‘ज्यांनी लोकांचा पैसा लुटला आहे, त्यांनाच सीबीआयने अटक केली आहे. असे असताना तृणमूल काँग्रेस रस्त्यावर येऊन निषेध का करत आहे? ते चोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का?’

या प्रकरणी पक्षाचे केंद्रीय नेतृत्व तृणमूल काँग्रेसच्या मागे उभे असताना राज्य काँग्रेसची भूमिका काय आहे, या प्रश्नावर मन्नान म्हणाले की, ‘केंद्रीय नेतृत्वाला जे वाटले तसे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी अटक करण्याच्या वेळेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पण ज्यांनी जनतेचा पैसा लुटला आहे त्यांच्याविरोधात सुरू केलेली निदर्शने थांबवा असे केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला कधीही सांगितले नाही.’ विशेष म्हणजे मन्नान यांच्याच याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने चिटफंड घोटाळा प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मात्र या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला होता. नोटबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांची एकी तोडण्यासाठी तृणमूल खासदारांना अटक करण्यात आली अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. सीबीआयच्या कारवाईच्या ‘वेळेबद्दल’ही पक्षाने आक्षेप घेतला होता.
 
तृणमूल खासदारांचे दिल्लीत धरणे
नवी दिल्ली - मोदी सरकारने घेतलेला नोट बंदीचा निर्णय आणि रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्यात पक्षाच्या खासदारांना झालेली अटक याच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सोमवारी नवी दिल्लीत धरणे आंदोलन सुरूच ठेवले.

तृणमूलच्या ३४ खासदारांनी सकाळी साउथ अव्हेन्यूसमोर धरणे आंदोलन सुरू केले. ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालले. वृत्तसंस्थेशी बोलताना तृणमूलचे नेते डेरेक ओ ब्रायन म्हणाले की, नोट बंदीच्या नावाखाली सुरू असलेल्या अत्याचाराचा आणि चौकशीच्या नावाखाली राजकीय कट रचण्याचा आम्ही निषेध करत आहोत. तृणमूलने मोदी सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलन सुरू केले असून हे धरणे आंदोलनही त्याचाच भाग आहे.

नोट बंदी आणि त्यामुळे लोकांना होणारा त्रास याच्या विरोधात असेच आंदोलन सोमवारी तसेच आणखी तीन दिवस पश्चिम बंगाल, भुवनेश्वर, पंजाब, किशनगंज, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि झारखंडमध्येही होईल, अशी माहिती पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. रोझ व्हॅली चिटफंड घोटाळा प्रकरणात तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार तपस पॉल आणि सुदीप बंदोपाध्याय यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पक्षाने मोदी सरकारच्या नोट बंदीच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन आणखी तीव्र केले आहे.