आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे मनसोक्त रडा, तणावापासून मुक्ती मिळवा! वाचा काय आहे क्राइंग थेरपी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- निरोगी जीवनासाठी हास्य क्लब, संगीत आणि योग या उपचारपद्धतींबद्दल तुम्ही ऐकले असेल. मात्र, आता मनसोक्त रडण्याच्या (क्राइंग थेरेपी) उपचार पद्धतीची नुकतीच सुरतमध्ये सुरुवात करण्यात आली. इथे लोक दर रविवारी चक्क क्राइंग थेरपीच्या वर्गाला जातात. आपल्यातील तणाव आणि एकाकीपणा दूर करण्याचा प्रयत्न करतात. लोकांना रडू यावे म्हणून त्यांच्या जीवनातील जुन्या वाईट घटना, आठवणी सांगितल्या जातात. ज्या आठवणीने संबंधित माणसाच्या भावना उचंबळून येतील त्या आठवाव्यात, असे या लोकांना सांगितले जाते. हा देशातील पहिला क्राइंग क्लब असल्याचे मानले जाते.

लाफ्टर थेरेपिस्ट व मानसोपचारतज्ज्ञ कमलेश मसालावाला यांनी या क्लबची स्थापना केली. पहिल्याच दिवशी ८० लोकांनी उपचार घेतले. ते करत असताना कमलेश यांनी वेगवेगळ्या मार्गाने लोकांना रडवण्याचा प्रयत्न केला. मूकपणे रडण्याचेही एक सत्र ठेवण्यात आले. यात लोकांना डोळे बंद करून रडण्यास सांगण्यात आले. या क्राइंग क्लासमध्ये लोकांनी परस्परांना आपल्या जीवनातील वाईट घटना आणि क्षण सांगितले. विशेष म्हणजे या उपचारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. डॉ. मुकुल चौकसी यांनी सांगितले, ‘४२ वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या गल्लीत एक श्वान होते. मी त्याच्याशी खूप खेळत असे. एकदा नगर परिषदेच्या लोकांनी त्याला विषारी बिस्कीट खाऊ घालून मारले. ही माझ्या जीवनातील पहिली मोठी दुखद घटना होती...’ क्राइंग क्लबमध्ये सहभागी डॉ. तृप्ती यांना पित्याच्या आठवणीने रडू कोसळले. त्या म्हणाल्या, मी माझ्या वडिलांशी संबंधित काही आठवणी सांगितल्या की इतर सदस्यही आपापल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणी सांगून रडू लागले. रडून मन मोकळे झाले की आपोआपच मनावरील ताण कमी होतो. 

काय आहे क्राइंग थेरपी?
या उपचार पद्धतीमध्ये व्यक्तीला रडवून त्याच्या मनातील दु:ख व्यक्त व्हावे, असा प्रयत्न केला जातो. यामुळे त्याचे मन हलके होते आणि तणाव कमी झाल्याने आरोग्यही चांगले राहते. डॉक्टरांनुसार, माणूस जेव्हा भावुक होतो तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येते. यामुळे त्याच्या मनातील तणाव दूर होतो आणि संबंधित व्यक्तीचा रक्तदाबही सामान्य राहतो. म्हणूनच माणसाने आपल्या आठवणीच्या माध्यमातून व्यक्त होणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...