आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसाचारानंतर बंगळुरूत शांतता; संचारबंदी मागे, कावेरी पाणीवाटप वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून उसळलेल्या हिंसाचारानंतर कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये बुधवारी शांतता होती. शहराच्या सर्व १६ पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रातून संचारबंदी हटवण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील वाहतूक आणि मेट्रो सेवा पुन्हा सुरू झाली. व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालयेही उघडली आहेत. सकाळी ९ वाजेपासून सर्व १६ पोलिस ठाण्यांतील संचारबंदी मागे घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

तामिळनाडूमध्ये कर्नाटकच्या काही लोकांवर हल्ला झाल्याच्या तसेच त्यांच्या मालमत्तांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आल्यानंतर कर्नाटकमध्येही हिंसाचार उसळला होता. तामिळनाडूची नोंदणी असलेल्या काही बस तसेच वाहने जमावाने पेटवून दिली होती. त्यामुळे १२ सप्टेंबरच्या रात्री बंगळुरूत संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता संचारबंदी हटवण्यात आली असली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जमावबंदी आदेश लागू आहे. संचारबंदी हटवण्यात आल्यामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी घराबाहेर पडणे शक्य झाले होते. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बुधवारी काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केला.
सुनावणीस सर्वोच्च न्यायालय सहमत
कावेरीच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केंद्र, तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी गुरुवारी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सहमती दर्शवली. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. कर्नाटकमध्ये गुरुवारी, तर तामिळनाडूमध्ये शुक्रवारी राज्यव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे यासंबंधीच्या जनहित याचिकेवर त्वरित सुनावणी करावी, अशी मागणी याचिकाकर्ते पी. शिवकुमार यांनी केली होती.
बातम्या आणखी आहेत...