आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दार्जिलिंगमध्ये तणाव कायम; कार्यकर्त्यांच्या मृतदेहासह रॅली, सिंग्मरीमध्ये धुमश्चक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दार्जिलिंगमध्ये जीजेएमने रविवारी काढलेली रॅली. - Divya Marathi
दार्जिलिंगमध्ये जीजेएमने रविवारी काढलेली रॅली.
दार्जिलिंग / कोलकाता - पश्चिम बंगालचे हिल स्टेशन दार्जिलिंगमध्ये रविवारीदेखील तणाव कायम होता. गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या (जीजेएम) एका कार्यकर्त्याच्या मृतदेहासह चौक बाजारातून रविवारी रॅली काढण्यात आली होती. रॅलीत हजारो निदर्शक सहभागी झाले होते. शनिवारी झालेल्या संघर्षात या समर्थकाचा मृत्यू झाला होता.  

संघर्षानंतर रविवारी संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले. या दरम्यान जीजेएम अध्यक्ष बिमल गुरुंग म्हणाले, गोरखा आंदोलनाला नक्षलवादी संघटनांचे समर्थन असल्यासंबंधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेले विधान खोटे आहे. त्या लोकांची दिशाभूल करत आहेत. ही राजकीय लढाई नाही. अस्मितेचा संघर्ष आहे. स्वतंत्र गोरखालँड होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीत. जीजेएमने ममता सरकारसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास नकार दिला. जीजेएम नेता बिनय तमांग म्हणाले, पश्चिम बंगाल सरकारसोबत यापुढे चर्चा केली जाणार नाही. ममतांनी आमचा उल्लेख नक्षलवादी, असा केला आहे. हा अपमान आहे. केंद्रातील भाजप सरकारशी चर्चा करण्यास आमची काहीही हरकत नाही. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली.  दार्जिलिंगचे प्रकरण तापू लागले आहे. त्यावरून सत्ताधारी ममता बॅनर्जी सरकारवर टीका होऊ लागली आहे. केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत असतानाच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सरकारच्या वतीने आवाहन करून केंद्राची भूमिका स्पष्ट केली. जीजेएमने देखील केंद्राशी जुळते घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात तणाव निवळण्याची चिन्हे आहेत. हे प्रकरण हिंसाचारामुळे ममता सरकारला चांगले जड गेले आहे. 
 
सिंग्मरीमध्ये धुमश्चक्री  
स्वतंत्र गोरखा प्रदेशासाठी समर्थकांचे आंदोलन सुरू असताना सिंग्मरीत शनिवारी पोलिसांसोबत उडालेल्या धुमश्चक्रीत दोन समर्थकांचा मृत्यू झाला, असा दावा जीजेएमद्वारे करण्यात आला आहे. पाेलिसांनी मात्र हा दावा फेटाळला. संघर्षात एकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांच्या खंडानंतर ८ जून रोजी दार्जिलिंगमध्ये गोरखालँडवरून हिंसाचार उसळला होता. दार्जिलिंगमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.   
 
हिंसाचार नव्हे, चर्चेतून मार्ग निघेल : राजनाथ 
- दार्जिलिंगमधील निदर्शकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा, असे आवाहन मी करतो. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात हिंसाचारातून काहीही मार्ग निघणार नाही. चर्चेतून प्रत्येक मुद्दा सोडवला जाईल.  
-राजनाथ सिंह, गृहमंत्री.  
 
आधी सुरक्षा दल हटवा : जीजेएमची मागणी 
- चर्चेचे सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी दार्जिलिंगमधून पोलिस व सुरक्षा दलास तत्काळ हटवण्यात यावे. सरकारने आम्हाला शांततामय व लोकशाही पद्धतीने आंदोलन करू द्यावे.  
-अमर राय, जीजेएम आमदार, दार्जिलिंग.  
बातम्या आणखी आहेत...