आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायम यांचा यू टर्न : अखिलेशच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सपाची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले जाणार नाही, असा निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी घेतला होता. मात्र, त्यांना तीन दिवसांनीच हा निर्णय बदलावा लागला. अखिलेश हेच मुख्यमंत्रिपदासाठी पक्षाचा चेहरा असतील, असे पक्षाने स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीनंतरच विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होईल, असे मुलायम यांनी शुक्रवारीच म्हटले होते.

पक्षाचे सरचिटणीस आणि संसदीय मंडळाचे सदस्य किरणमय नंदा यांनी सोमवारी सांगितले की, मुलायम यांच्या शुक्रवारच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मुलायमसिंह यांनी शिवपाल आणि रामगोपाल यादव या आपल्या भावांशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा करायला लावली.

अखिलेश यांना पक्षाचा चेहरा बनवण्यात येणार नाही, अशी घोषणा केल्यानंतर सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. एक दिवसापूर्वीच हे पत्र उघड झाले होते. त्यानंतर घूमजाव करण्यात आल्याने पक्षाला हा वाद संपवायचा आहे हे स्पष्ट झाले. यादव कुटुंबीयांमध्ये तडजोड करणारी कारवाई अशा स्वरूपात त्याकडे पाहिले जात आहे. अखिलेश यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. त्यावरून ते आधीच नाराज होते. त्यात मुलायम यांच्या शुक्रवारच्या घोषणेमुळे आणखी भर पडली होती.

भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देणार नाही
बरेली | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही. प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी सोमवारी ही घोषणा केली. भाजपने उत्तर प्रदेशसाठी ‘मिशन ३००’ चे उद्दिष्ट ठेवले आहे. पक्ष ४०३ पैकी ३०० जागा जिंकेल, असा दावा मौर्य यांनी केला. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय संसदीय मंडळ करणार आहे.

रिता बहुगुणा काँग्रेस सोडून भाजपत ?
नवी दिल्ली । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिता बहुगुणा जोशी भाजपमध्ये जाणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. तसे झाल्यास ब्राह्मण व्होट बँकेला आपल्याकडे वळवण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना धक्का पोहोचू शकतो. पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले आहे, तर राज बब्बर प्रदेशाध्यक्ष आहेत.राज्यात निवडणुकीची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे आहेत. म्हणजे रिता बहुगुणा यांच्याकडे पक्षात सध्या कुठलीही सक्रिय भूमिका नाही. त्यामुळेच २००७-१२ या काळात प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या रिता बहुगुणा या पक्षावर नाराज आहेत, असे म्हटले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...