आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 अामदारांच्या बळावर दादागिरी करू नका : JDU, तेजस्वी यादव राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा  - बिहारमध्ये जदयू-राजद महाआघाडीमध्ये राजकीय दरी रुंदावत चालली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांच्यावरील आरोपावर आपले निर्दोषत्व  सिद्ध करावे, यासाठी जदयूने दबाव वाढवला आहे. तर दुसरीकडे ८० अामदारांच्या बळावर चाललेली दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला.  
 
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र असलेले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नाव जमीन आणि हॉटेल घोटाळ्यात घेतले जात आहे. सीबीआयने त्यांची चाैकशी सुरू केली आहे. तसेच राष्ट्रीय जनता दल ८० अामदारांचे बळ दाखवत आहे. परंतु २०१० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे केवळ २२ आमदार निवडून आले होते. २०१५ मध्ये नितीशकुमार यांच्या रूपाने विश्वसनीय चेहरा महाआघाडीत होता म्हणून राजदचे संख्याबळ वाढले, हे त्यांनी विसरू नये, असे जदयूचे प्रमुख प्रवक्ते संजयसिंग यांनी वृत्तसंस्थेस सांगितले.  
 
बिहार विधानसभेत २४३ जागा असून राजद  ८०, जदयू ७१ आणि काँग्रेस २७ आणि भाजपचे ५३ आमदार असे संख्याबळ आहे.  
 
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बिहारमधील महाआघाडी वाचवण्यासाठी शुक्रवारी पुढाकार घेतला. त्यांनी फोनवरून लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्याशी चर्चा केली. या उभय नेत्यांनी अापसातील मतभेद मिटवण्यासाठी योग्य मार्ग काढावा असे त्यांनी सांगितले. 
 
तेजस्वी यादव राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत  : दरम्यान, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विरोधात उठलेल्या आरोपाच्या वादळामुळे ते राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असून लालूप्रसाद यादव रांचीहून परतल्यानंतर यावर निर्णय होईल, असे काही माध्यमांनी म्हटले आहे. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्याच्या संदर्भात खटल्यास हजर राहण्यासाठी रांचीला गेले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...