आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादाचा एकजुटीने मुकाबला करण्याचा भारत-फ्रान्सचा निर्धार, मोदी-एरॉल्ट यांच्यात चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारत आणि फ्रान्सने दहशतवादाचा एकजुटीने मुकाबला करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रेंच परराष्ट्रमंत्री जीन-मार्क एरॉल्ट यांच्यात रविवारी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यावर उभय नेत्यांत सहमती झाली आहे.  

उभय देशांतील भागीदारीच्या विविध क्षेत्रांतील शक्यतांवर आम्ही चर्चा केली. त्यातही संरक्षण महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. भारत स्वसंरक्षणावर अधिक भर देणार आहे. त्यामुळे संरक्षणात अधिक देवाण-घेवाण केली जाईल. भारताच्या संरक्षण गरजांचा बैठकीत विचार करण्यात आला. राफेल लढाऊ विमानाचे उदाहरण देता येऊ शकेल. भारताला पाणबुडी हवी आहे. हेलिकॉप्टर हवे आहे. भारताची ही गरज लक्षात घेऊन आम्ही त्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे, असे एरॉल्ट यांनी सांगितले. वाढत्या दहशतवादावर दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. १४ व्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी व एरॉल्ट यांच्यात ही द्विपक्षीय चर्चा झाली. दरम्यान, फ्रेंच मंत्र्यांनी बंगळुरूतील रसेल बाजारपेठेला भेट दिली. २०१६ मध्ये सुमारे ४ हजार भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी फ्रान्समध्ये आले होते. २०२० मध्ये १० हजार विद्यार्थी फ्रान्समध्ये शिक्षणासाठी यावे, असे उद्दिष्ट ठेवण्यात आहे, असे एरॉल्ट यांनी सांगितले.  
 
भारतीय कंपन्यांना संधी  
भारतात अनेक फ्रेंच कंपन्या आहेत. भारतीय उद्योजकांनीदेखील फ्रान्समध्ये गुंतवणुकीसाठी यावे. त्यांचे स्वागत आहे. त्यातून दोन्ही देशांच्या विविधांगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा एरॉल्ट यांनी व्यक्त केली आहे. एरॉल्ट गुजरातमधील जागतिक परिषदेतही सहभागी होणार आहेत.  
 
गेल्या वर्षी झाला मोठा करार  
भारत-फ्रान्समध्ये गेल्या वर्षी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा व्यवहारावर सहमती झाली. हा करार सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचा आहे. ही विमाने अण्वस्त्रेदेखील वाहून नेऊ शकतात. ही विमाने शस्त्रागारात जमा झाल्यानंतर भारतीय हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. करारानुसार भारताला ३६ विमाने मिळणार आहेत. अर्थातच हा व्यवहार पाकिस्तानला धडकी भरवणारा आहे.  
नागरी अणुऊर्जेवरही चर्चा  
भारत-फ्रान्समध्ये नागरी अणुऊर्जेवरही चर्चा झाली. पर्यावरणविषयक पॅरिस कराराची अंमलबजावणी काटेकोरपणे केले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत दिली आहे. त्यामुळे भारताला फ्रान्सकडून या क्षेत्रात मदत मिळण्याची चिन्हे आहेत. अंतराळ क्षेत्रातही फ्रान्स व भारत परस्परांना सहकार्य करणार आहेत. आर्थिक क्षेत्रातही दोन्ही देश भागीदार म्हणून वाटचाल करतील. दोन्ही देशांत विविध क्षेत्रांत गुंतवणुकीचाही निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.