आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीमुळे झारखंडमधील नक्षलींना जाणवतेय पैशांची चणचण, विविध गटांचे अंदाजे ८० कोटींचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- झारखंडमध्ये अनेक कट्टरवादी गट सक्रिय आहेत. विमुद्रीकरणामुळे त्यांच्या कारवायांमध्ये गतिरोधाची स्थिती निर्माण झाली आहे. या विविध गटांचे अंदाजे ८० कोटींचे नुकसान झाल्याचा अनुमान आहे. ८ नोव्हेंबरपासून त्यांच्या हालचाली थंडावल्याचे येथील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १००० व ५०० च्या जुन्या नोटा चलनबाह्य करण्यात आल्यानंतर या गटांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होते. अनेक नक्षली व अतिरेकी कारवायांवर त्यामुळे नियंत्रण आल्याचे झारखंडचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आर. के. मल्लिक यांनी सांगितले. ८० कोटींचे चलन यामुळे गोठवले गेल्याचा दावा त्यांनी केला.  

करवसुलीद्वारे निधी उभारला जातो  
गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार नक्षलवादी करवसुलीद्वारे आत्तापर्यंत वार्षिक १४० कोटी रुपयांचा निधी गोळा करत. तीन वर्षांपूर्वी नक्षलवादी कारवायांना लगाम घालण्यासाठी त्याविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली. त्यानंतर हा निधी १०० कोटींवर आला होता. गेल्या दोन वर्षांत यात घट झाल्याचे मल्लिक यांनी सांगितले. नक्षली व इतर कट्टरवादी संघटना १०० कोटी रुपयांचा निधी बचत करत. मात्र, विमुद्रीकरणामुळे हे चलन निरुपयोगी ठरले आहे.  

२० कोटी वाचवण्यात यश
नक्षली समर्थक आणि सहानुभूतीदारांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचे चलन बदलून घेण्यात या गटांना यश आले आहे. यासाठी काही गावकरी व शेतकऱ्यांचीही मदत घेण्यात आली. बँकांवर जबरदस्ती करून चलन बदलासाठी नक्षलींनी दबाव आणल्याच्या १०० घटना राज्यात घडल्या. मात्र, यात त्यांना यश आले नाही, असे आर. के. मल्लिक यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात ३५ नक्षलींनी आत्मसमर्पण केले.

माआेवादी विचारांच्या विपरीत वर्तन  
विमुद्रीकरणानंतर माआेवाद्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यांच्या निधीचा स्रोत आटल्याने त्यांनी नाइलाजास्तव दरोड्याचा मार्ग अवलंबल्याचेही काही घटनांमध्ये दिसून आले, असे मल्लिक म्हणाले. माआेवादी नक्षलींनी आत्तापर्यंत कधीच लुटीचे पैसे वापरलेले नाहीत. त्यांच्या विचाराच्या ते विरुद्ध आहे. मात्र, पैशाचा स्रोत आटल्याने त्यांनी नाइलाजास्तव हे पाऊल उचलल्याचे मल्लिक यांनी सांगितले. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यास पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.  
 
बातम्या आणखी आहेत...