आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायत्री प्रजापती अजून मंत्रिमंडळात कसे?, राज्यपाल राम नाईकांची अखिलेश यांना विचारणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - बलात्कारप्रकरणी फरार असलेले गायत्री प्रजापती अजूनही मंत्रिमंडळात कसे राहू शकतात? अशी विचारणा राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे केली. राज्यपालांनी एक पत्र लिहून यावर खुलासाही मागितला आहे.  
 
प्रजापतींवर अजामीनपात्र वाॅरंट निघालेले असताना आणि देश सोडून जाण्याच्या शंकेमुळे न्यायालयाकडून त्यांचा पासपोर्ट रद्द झालेला असताना प्रजापतींचे मंत्रिमंडळात राहणे गंभीर असून लोकशाहीच्या प्रतिष्ठेचा आणि नैतिकतेचा हा प्रश्न असल्याचे राज्यपालांनी नमूद केले आहे. “गायत्री प्रजापतीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट निघाले असून त्यांच्यावर बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे,  तरीही ते मंत्रिमंडळात असल्याने लोकशाहीच्या नैतिकतेवर अाणि प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी ही घटना आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची गरज आहे,’ असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. प्रसिद्धी माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार प्रजापतीविरोधात लूकअाऊट नोटीस जारी झाली असून ते परदेशात पळून जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्यांचे मंत्रिपदी असणे अतिशय गंभीर बाब असल्याचे राम नाईक म्हणाले.  
राज्यपाल म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी त्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते, पण त्यांनी अद्याप शरणागती पत्करल्याचे निदर्शनास आलेले नाही आणि ते फरार आहेत.  त्यामुळे त्यांची परदेशात पळून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत आणि ते त्यांना अटकही करतील.  

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी सपाचे  ज्येष्ठ नेते गायत्री प्रजापतीवर  सामूहिक बलात्कार आणि  अन्य  एका महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यावरून वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.  

 काँग्रेस -सपा आघाडी गायत्री प्रजापती मंत्राचा जप करत आहे,  अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.  त्यानंतर शनिवारी प्रजापतींचा पासपोर्ट रद्द करुन लूकआऊट नोटीस जारी झाली.  तसेच प्रजापती यांना मंत्रिमंडळातून काढावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांनीही केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...