आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘देणारे पटेल’ हार्दिक पटेल यांच्यापासून 4 हात दूरच; अारक्षणाच्या मागणीचे समर्थन नाहीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आणंद (गुजरात)- गुजरातच्या अत्यंत समृद्ध आणंद व खेडा जिल्ह्यांच्या परिसरातील पाटीदार समाजाची पारंपरिक ओळख ‘देणारे पटेल’ अशी अाहे. त्यामुळे आरक्षणासाठी याचना केली तर ही ओळख पुसून आम्ही ‘मागणारे पटेल’ ठरू, अशी सार्वत्रिक भावना या भागातील बहुसंख्य पटेल समाजाची आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या ‘हार्दिक फॅक्टर’चा थोडाही परिणाम या भागात दिसून येत नाही. येथील तब्बल ८०० गावे आणि शहरी भागामधला चारोतर पाटीदार समाज आपली ही पारंपरिक ओळख जपण्याच्याच मूडमध्ये दिसतो. परिणामी, पाटीदार आरक्षणाच्या निमित्ताने समस्त पटेल समाज एकवटल्याचे रंगवले जात असलेले चित्र आणि वास्तव यामध्ये बरेच अंतर पाहावयास मिळते. 

 
गुजरातची यंदाची निवडणूक भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने साऱ्या देशभरात त्याविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्यातही गुजरातमधील संख्येने सर्वाधिक असणाऱ्या पटेल समाजाने आपल्या मागण्यांसाठी छेडलेले पाटीदार अारक्षण आंदोलन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यामुळे हा सर्वाधिक कळीचा मुद्दा बनत आहे. या आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या आक्रमक भूमिकेचा मोठा फटका भाजपला बसेल असे दावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, अत्यंत समृद्ध म्हणून गणल्या जाणाऱ्या चारोतर प्रदेशातील पटेल समाज मात्र आपली ‘देणारे पटेल’ ही ओळखच अधिकाधिक घट्ट करू पाहत असल्याचे पुढे येते.  
आणंद, खेडा, नडियाद आणि लगतचा मोठा भाग चारोतर प्रदेश म्हणून ओळखला जातो. ‘पटेल डॉमिनेशन’ असलेल्या या परिसराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथली ‘एनआरआय’ गावे. उद्योग- व्यवसायाच्या निमित्ताने या गावांतील जवळपास निम्मी लोकसंख्या परदेशात स्थायिक असून आपापल्या गावाच्या विकासासाठी ही मंडळी तिकडून वेळोवेळी निधी पुरवत असतात. त्यामुळे विकासकामांसाठी येथे सरकारी मदतीवर फारसे अवलंबून राहावे लागत नाही. बोरसद परिसरातल्या धर्मजचे उदाहरण त्यासाठी घेता येईल. या गावातील घरटी किमान एक पटेल विदेशात असून अवघ्या दहा हजार लोकसंख्येच्या या गावात बँकांची संख्या मात्र दीड डझन आहे. शिवाय प्रत्येक शाखेत शेकडो कोटींच्या ठेवी आहेत !  शाळा असो, उद्यान असो की सुशोभीकरणाची कामे असोत, त्यासाठी इथली एनआरआय मंडळी कधीच हात आखडता घेत नाहीत.   


थोड्याफार फरकाने हीच स्थिती दाहोल, बोदाल, बादरण आदी गावांमध्ये आहे. मुळातच चारोतर परिसर शेती, दूधदुभत्याने समृद्ध असल्यामुळे इथला पटेल समाज पूर्वीपासूनच सक्षम आहे. औद्योगिकीकरणामुळे व्यापार- उदीमही वाढल्याने या समृद्धीत भरच पडत आहे. साहजिकच आम्ही ‘देणारे पटेल’ असताना आता आरक्षणाच्या निमित्ताने कुणाकडे याचना कशाला करायची?, अशी येथील पटेलांची भावना आहे. म्हणूनच हा परिसर हार्दिकच्या आंदोलनापासून पूर्णपणे अलिप्त दिसतो आणि त्यातून पाटीदार आंदोलनाच्या निमित्ताने गुजरातमधला समस्त पटेल समाज एकवटला नसल्याचे वास्तव प्रकर्षाने पुढे येते.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा प्रतिक्रीया....

 

हेही वाचा, 
‘पाॅवर अाॅफ पाटीदार’ चित्रपट काँग्रेस प्रदर्शित करू शकली नाही, अारक्षण कसे देणार?

 

बातम्या आणखी आहेत...