आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुरियत नेते नजरकैदेत, दोन तासांनंतर सुटका, पाकिस्तानला कठोर संदेश देण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर, इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी नेत्यांना गुरुवारी सकाळी अचानक नजरकैदेत घेण्यात आले खरे, परंतु अवघ्या दोनच तासांनंतर त्यांची सुटकाही करण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे किंवा नजरकैदेतून त्यांच्या सुटकेचे कारणही सांगितले नाही. पाकिस्तान आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (एनएसए) रविवारी बैठक होत आहे. पाकिस्तानचे एनएसए सरताज अजीज यांनी या दरम्यान फुटिरतावादी हुरियत नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चेचा कार्यक्रम आखला आहे. त्यावरून उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. नजरकैदेतील सर्वांची सुटका केल्याचे सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र सय्यद अली शाह गिलानी व शब्बीर अहमद शाह यांना साेडले नसल्याचे हुरियतचे प्रवक्ते अकबर यांनी म्हटले आहे.
काश्मिरी लोकांशी चर्चा सुरूच ठेवू : पाकिस्तान
पाकिस्तानची काश्मिरी लोकांशी चर्चा सुरूच राहील, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते काझी खलिलुल्लाह यांनी इस्लामाबादेत सांगितले. पाकिस्तानी उच्चायुक्त फुटिरतावादी नेत्यांना चर्चेसाठी बोलावतो व सल्लामसलत करतो, ही जुनी परंपरा आहे, असे ते म्हणाले.
कोणाचा दबाव तर नाही ना?, पंतप्रधानांनी उत्तर द्यावे : काँग्रेस
मागच्या वेळी पाकिस्तानी उच्चायुक्तांनी हुरियत नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते, तेव्हा चर्चा रद्द केली होती. मग आताच चर्चा का होत आहे? कोणाचा दबाव तर नाही ना? या प्रश्नांची उत्तरे देशाला पंतप्रधानांकडून जाणून घ्यायची आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.
हुरियतच्या नेत्यांची पाकस्तानी अधिकाऱ्यांशी भेट नकाे : भाजप
जम्मू-काश्मीरच्या जनतेने एक सरकार निवडले आहे. हुरियतचे लोक लोकशाहीची हत्या करत आहेत.त्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी भेटू देऊ नका, असे जम्मू-काश्मिरातील भाजपचे आमदार रवींद्र रैना म्हणाले.
युद्ध झाल्यास भारतालाच फटका
भारत तुलनेने जास्त शक्तिशाली आणि यशस्वी देश आहे. परंतु भारताचे पाकिस्तानशी आणखी एखादे युद्ध झाले तर त्यात भारताचेच जास्त नुकसान होईल, असे न्यूयॉर्क टाइम्सने गुरुवारी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.