आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील महिन्यात १०३ उपग्रहांचे प्रक्षेपण, इस्रोची महामोहीम, जगातील पहिलाच प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुपती- इस्रो अर्थात भारताच्या अवकाश संशोधन संस्थेच्या नावावर लवकरच नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये इस्रो एकाच रॉकेटने १०३ उपग्रहांना प्रक्षेपित करणार आहे. आतापर्यंत अशा प्रकारचा प्रयोग जगात कोणत्याही देशाने केलेला नाही. त्यापैकी तीन परदेशी उपग्रह आहेत.
  
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून शंभरावर उपग्रह एकाचवेळी झेपावणार आहेत. या प्रकल्पात इतर देशांचाही सहभाग आहे. त्यात अमेरिका, जर्मनीचा समावेश असेल. एकाचवेळी एकाच रॉकेटने शंभर उपग्रह पाठवण्याचा प्रयोग आम्ही करणार आहोत, अशी माहिती संचालक एस. सोमनाथ यांनी दिली. तिरुपती येथील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सोमनाथ बुधवारी बोलत होते.  संशोधन संस्थेने एकाच रॉकेटने एकावेळी ८३ उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना तयार केली होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ते झेपावणार होते, परंतु आता त्यात २० परदेशी उपग्रहांची भर पडणार आहे. त्यामुळे प्रकल्प आणखी आठ दिवस लांबणीवर पडला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तो पूर्ण केला जाणार आहे, असे सोमनाथ यांनी सांगितले.  

मार्चमध्ये साऊथ एशियन सॅटेलाइट  
जीसॅट-९ अंतर्गत मार्चमध्ये साऊथ इंडियन सॅटेलाइट लाँच केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबाबतची घोषणा केली होती. भारताबरोबरच श्रीलंका, मालदिव, बांगलादेश, नेपाळ, भूतान या शेजारी राष्ट्रांना उपग्रह लाँचिंगच्या महामोहिमेचा लाभ मिळू शकणार आहे, असे इस्रोचे सहायक संचालक एम. नागेश्वर राव यांनी सांगितले.  

शुक्र, गुरू पुढची मोहीम  
मंगळावरील यशस्वी मोहिमेनंतर इस्रोने आता गुरू व शुक्राच्या अभ्यासाची तयारी सुरू केली आहे. इतर ग्रहांची उपयुक्तता आहे, हे जाणून घेण्याचा या प्रकल्पांचा उद्देश आहे. त्यासाठी कशाप्रकारचे उपग्रह व रॉकेटची गरज भासेल, याचा  अभ्यास सुरू आहे. त्यात आणखी वर्षे जातील, असा विश्वास नागेश्वर राव यांनी खगोलीय परिषदेत व्यक्त केला.  

लहान आकारातील उपग्रहांचा समावेश  
एकाचवेळी अवकाशात पाठवण्यात येणारे उपग्रह आकार व वजनाने लहान आहेत. उपग्रहांचे एकूण वजन १३५०  किलोग्रॅम आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अंतराळ क्षेत्राच्या इतिहासात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
  
गेल्या वर्षी २० उपग्रहाचे लाँचिंग  
इस्रोने गेल्या वर्षी एकाचवेळी २० उपग्रह लाँच केले होते. एकाच अवकाश मोहिमेत एवढ्या मोठ्या संख्येने उपग्रह लाँच करण्याची ही पहिलीच वेळ होती. २०१४ मध्ये रशियाने ३७ उपग्रह पाठवून जागतिक विक्रम नोंदवला होता. अमेरिकेने २९ उपग्रह पाठवले होते.  
बातम्या आणखी आहेत...