आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुनैद हत्याकांड: अटक केलेला संशयित रमेश खुनी नसल्याची दिली साक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुनैद - Divya Marathi
जुनैद
फरिदाबाद- रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक संजय किशोर आणि वरिष्ठ कमांडंट शशी कुमार यांनी सोमवारी बल्लभगड आणि असावटी  रेल्वे स्थानकावर जाऊन जुनैद हत्याकांडासंबंधी चौकशी केली. त्यांनी येथील कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण तपशील घेतला आहे. असावटी स्थानकावर तैनात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानाने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने घटनेचा तपशील नोंदवला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे की, निळ्या शर्टमधील व्यक्तीने चाकूचे वार केले होते. 

हल्लेखोरांनी जखमींना रेल्वे प्लॅटफॉर्मवर फेकले. राखीव पोलिस दलाने सूचना दिल्यानंतर खासगी कंपनीची रुग्णवाहिका व रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले. महासंचालक संजय किशोर यांनी भांडणाच्या मूळ कारणाविषयी चौकशी केली. आरपीएफ कर्मचाऱ्याने सांगितले की या घटनेनंतर डब्यातून दोन-तीन तरुण असावटी येथे उतरले. त्यापैकी एका मुलाने सांगितले की, जुनैदचा गट आणि हल्लेखोरांच्या गटात आेखला रेल्वेस्थानकावर वाद सुरू झाला. जुनैदचा मित्र आसनावर लुडो खेळत होता. याच मुद्द्यावर भांडण सुरू झाले. कारण अनेक लोक जागा नसल्याने उभे होते. लुडो खेळण्यावरून भांडण सुरू झाले. 

जुनैदच्या गटातील एकाने आपला पाय समोरच्या युवकाजवळ ठेवला. त्याने पाय खाली ठेवण्यास सांगितल्याने भांडणाला तोंड फुटले. बल्लभगड स्टेशन येण्यापूर्वी जुनैदच्या गटाने त्यांचे गाव खंदावलीच्या युवकांना फोन करून बल्लभगड स्थानकावर येण्यास सांगितले. येथेच मारहाण सुरू झाली. यादरम्यान निळ्या शर्टमधील व्यक्तीने चाकूहल्ला केला. डब्यातील अनेक लोक हल्ला करणाऱ्यांची कड घेत होते. त्यांनीही जुनैदच्या गटाला मारहाण सुरू केली.  त्यांनीही हल्ले केले. असावटी येथे त्यांनी चौघांना धक्काबुक्की करत प्लॅटफॉर्मवर उतरवले. पैकी एका तरुणाला चालत्या रेल्वेगाडीतून धक्का दिला.  

आरोपी रमेशला मद्यधुंद अवस्थेत अटक  
जुनैद हत्याकांडातील अटक केलेला रमेश जोधपूर येथील असून त्यानेदेखील त्या दिवशी निळा शर्ट घातला होता. पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्याच्या शर्टवर रक्ताचे डाग होते. रमेशला मद्यधुंद अवस्थेत ठाण्यात आणले गेले. रेल्वे पोलिस दलाचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र वर्मा यांनी सांगितले की, रमेशने चाकूहल्ला केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याजवळ चाकू कुठून आला हे त्यालाही माहीत नाही. तो कामाच्या ठिकाणाहून घरी जात होता. सकाळी ८ ला बल्लभगड स्थानकावर तो पोहोचला. तेथून पलवल येथे गेला. तेथे मद्यपान केले. पुन्हा घरी जाण्याऐवजी तो बल्लभगड स्थानकावर पोहोचला. आपण अति मद्यपान केल्याचे त्याला वाटले. त्यामुळे तो पलवलला जाणाऱ्या रेल्वेगाडीत चढला. येथे जुनैदचे इतर तरुणांशी भांडण सुरू होते. याचदरम्यान त्याच्या हाती कोणीतरी चाकू दिला. प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की रमेशने चाकू मारला नाही. केवळ भांडणात सहभागी होता. मृत जुनैदचा भाऊ हाशिमनेदेखील चाकूहल्ला करणारा रमेश नसल्याचे सांगितले. यामुळे आता पोलिसांसमोरचे आव्हान वाढले आहे. रमेशचे रेकॉर्ड तपासले असता कळते की, तो मनोरुग्ण आणि मद्यपी आहे. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमुळे रमेशने हल्ला न केल्याचे सिद्ध होत आहे. सध्या पोलिसांनी इतर फरार आरोपींना शोधण्याची मोहीम हाती घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पुरस्कार वापसी 
सामाजिक कार्यकर्ता शबनम हाशमी यांनी प्रक्षुब्ध जमावाने मुस्लिम तरुणाची हत्या केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय अल्पसंख्याक अधिकार पुरस्कार परत केला आहे. आयोगाने २००८ मध्ये त्यांना या पुरस्काराने गौरवले होते. हाशमी यांनी म्हटले की आयोगाने विश्वासार्हता गमावली आहे. अल्पसंख्यांकावर हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त केली. 

गोमांसाचा मुद्दा सर्व साक्षीतून समोर आला नाही. यावरूनच देशभरात जुनैद हत्याकांडाचा निषेध होत आहे. मात्र स्थानिकांनी याविषयी चकार काढला नाही.
बातम्या आणखी आहेत...