आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणांना माफी; पहिल्यांदा घडलेले 4500 गुन्हे मागे घेणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काश्मीरमध्ये स्थैर्य व शांतता बहाल करण्यास व काश्मिरींची मने जिंकण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.  सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना प्रथमच सरसकट माफी देण्यास राज्य सरकारला सांगितले आहे. यामुळे काश्मिरातील ४५०० तरुणांवरील खटले परत घेतले जाणार आहेत. या निर्णयाचे पडसाद कसे उमटतात, यावरून इतर दगडफेक करणाऱ्यांच्या खटल्यांवर विचार होईल. काश्मीरमध्ये नियुक्त करण्यात आलेले मध्यस्थ दिनेश्वर शर्मा यांच्या शिफारशीवरून केंद्राने हा निर्णय घेतला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी ठार झाल्यानंतर दगडफेक करणाऱ्यांवर एकूण ११५०० खटले दाखल करण्यात आले होतेे. यापैकी ४५०० खटले प्रथमच दगडफेक करणाऱ्यांवर दाखल झालेले आहेत. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली.   


शहिदांसाठीच्या मदतीत केंद्राचा हिस्सा दहापटींनी वाढला  
दहशतवाद्यांशी लढताना शहीद होणाऱ्या पोलिसांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत केंद्र सरकारचा हिस्सा दहापटींनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार, सध्याची मदत ४३ लाखांवरून वाढवून ७० लाख रुपये करण्यात आली आहे. यात केंद्राचा हिस्सा ३ लाख रु. वरून ३० लाख रु. करण्याचा प्रस्ताव आहे. निमलष्करी दलांच्या शहिदांच्या वारसांना ७५ लाख रु. मिळतात.


दहशतवाद सोडून देणाऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक   
जम्मू़-काश्मीरमध्ये दहशतवाद सोडून मुख्य प्रवाहात येणाऱ्या तरुणांसाठी सीआरपीएफने हेल्पलाइन क्रमांक  १४४१ सुरू केला आहे. याचबरोबर अशा तरुणांचे पालक, मित्र व शुभचिंतकांना मदत करण्यासाठी ‘मदतगार’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. जूनमध्ये सुरू करण्यात आलेल्या या सेवेवर आतापर्यंत ७० हजार कॉल आले आहेत.   

बातम्या आणखी आहेत...