आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृद्य भेट: डाव्या अंगठ्याच्या निशाणीवरून सापडला परभणीचा मनोरुग्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केसरीसिंहपूर (श्रीगंगानगर)  - चार वर्षांपूर्वी हरवलेल्या भावाला पाहून दुसऱ्या भावाचे अाणि पुतण्याचे डोळे पाण्याने भरून आले. मात्र, हे आनंदाश्रू होते. त्याच्या आईवडिलांनी तर वैजनाथ सापडेल याची आशा सोडून दिली होती. आता योगायोग असा की, वैजनाथच्या  मुलीचे २२ फेब्रुवारीला लग्न आहे. पण तो डेरा सच्चा सौदा या धार्मिक संघटनेच्या  राजस्थानातील एका कार्यकर्त्यास सापडला.  

महाराष्ट्रातून चार वर्षांपूर्वी हरवलेला वैजनाथ हा गेल्या १५ वर्षांपासून मनोरुग्ण आहे. पण तो आई, पत्नी, मुलगा-मुलगी, भाऊ, पुतण्यांचे फोटो ओळखतो. सच्चा डेराचे राजेंद्र शर्मा यांना तो ३० जानेवारीला मोहल्ला गावात हा मनोरुग्ण फाटक्यातुटक्या कपड्यात भटकत असताना आढळला. राजेंद्र शर्मा त्याला आपल्या गावात घेऊन आले. त्यानंतर त्यांनी ई-मित्रवर त्याच्या अंगठ्याचे निशाण घेतले व ओळख शोधून काढली. अथक प्रयत्नाने त्यांनी त्याचा पत्ता व नाव शोधून काढले. तो अवलगाव, जिल्हा परभणी (महाराष्ट्र) येथील रहिवासी असल्याचे समजले. त्याचे नाव वैजनाथ धोंडिबा केदारे असल्याचे समजले. त्याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्याच्या आधार कार्डाच्या मदतीने त्याचा भाऊ शिवाजी धोंडिबा केदारे याचा मोबाइल क्रमांक सापडला. त्यांनी शिवाजीशी संपर्क साधला. त्यानंतर शिवाजी व पुतण्या नागसेन रविवारी सकाळी तेथे पोहोचले. पंचायत मंदिरात डेराच्या कार्यक्रमात स्थानिक नगराध्यक्ष काळूराम बाजीगर आणि सहायक फौजदार भुरा राम यांच्या उपस्थितीत वैजनाथला त्यांच्या हवाली करण्यात आले.  या घटनेची गावकऱ्यांत चर्चा रंगली आहे. 
 
पिनकोडचे शेवटचे क्रमांक बदलून शोधले आधार कार्ड  
चौकशी व भाषेच्या अाधारे तो महाराष्ट्रातील रहिवासी असावा, अशी शक्यता होती. यावर केसरीसिंहपूर ई-मित्रवर त्याचे आधार कार्ड सर्च करण्यासाठी त्याच्या अंगठ्याची निशाणी घेण्यात आली. त्यावर पिन कोड मागण्यात आला. शेवटचे तीन क्रमांक सतत बदलण्यात आले. सुमारे तीन तास प्रयत्न करूनही जेव्हा ४३१५१४ पिनकोड टाकण्यात आला तेव्हा आधार कार्डावर नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक आढळले.
 
१५ वर्षांपूर्वी निवडणूक प्रचार, आताही तो भाषणाचे हावभाव करतो  
शिवाजी धोंडिबा यांनी सांगितले : वैजनाथ हा गावच्या बँडबाजा पथकात होता. त्यावरच त्याचा निर्वाह चालत असे. १५ वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तो बाबासाहेब फळे यांचा प्रचार करत होता. ते निवडणूक हरले. त्याचा वैजनाथला धक्का बसला. तो मनोरुग्ण झाला. आताही तो माइक हातात धरल्याचा हावभाव करतो. त्याच्यावर पुण्यात उपचारही केले होते. याअाधीही तो घर सोडून गेला व नंतर तिरुपती बालाजी येथे सापडला. चार वर्षांपूर्वी तो पुन्हा घरातून गायब झाला.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...