आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : शहीद भगतसिंग यांची डायरी आता हिंदीत लवकरच उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद  - “लिख रहा हूं मैं अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इन्कलाब लाएगा, मैं रहूं या ना रहूं पर ये वादा है तुमसे मेरा की मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब अाएगा... ‘ देशभक्तीने ओतप्रोत भरलेली ही वाक्ये शहीद -ए- आझम भगतसिंगद्वारा तुरुंगात लिहिलेल्या डायरीतील आहेत. या ओळीतून त्यांची देशभक्तीची भावना व्यक्त होते. भगतसिंग यांनी लाहोर जेलमध्ये ज्या अन्वनित हालअपेष्टा सोसल्या त्या काळातील प्रत्येक शब्द या ४०४ पानी डायरीत शब्दबद्ध झाला आहे. त्यांच्या ऐतिहासिक डायरीतील सर्व तपशील लवकरच हिंदीमध्ये लोकांसमोर येणार आहे. इंग्रजी आणि उर्दूमध्ये लिहिलेल्या या डायरीचा अनुवाद त्यांच्या वारसांनी हिंदीत केला. आता ती डायरी प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. सप्टेंबर महिन्यात भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त  भोपाळला या डायरीचे प्रकाशन होईल.    
 
भगतसिंग एक उत्तम वक्ता, वाचक आणि लेखक होते. तुरुंगात असताना भगतसिंगांनी लिहिलेली डायरी ती इंग्रजीत होती. त्यात उर्दू भाषेचाही वापर करण्यात आला होता. ही डायरी याआधी इंग्रजीत प्रसिद्ध झालेली आहे. परंतु ती आजवर हिंदी भाषेत उपलब्ध नव्हती. या पुस्तकात एका बाजूला त्यांच्या डायरीतील पानाची स्कॅन कॉपी, तर बाजूच्या पानावर हिंदीत अनुवाद असेल. 
 
शहीद   भगतसिंग यांनी लिहिलेली मूळ डायरी त्यांचा पुतण्या बाबरसिंग यांच्याकडे होती. त्यांच्या निधनानंतर आता ती डायरी बाबरसिंगचे सुपुत्र यादवेंद्र संधू यांच्याकडे आहे. संधू फरिदाबादमध्ये राहतात. संधू यांनी सांगितले, आतापर्यंत भगतसिंगांच्या बाबतीत जी काही पुस्तके प्रसिद्ध झाली त्यात लेखकांचे विचार असत.  या डायरीच्या माध्यमातून त्यांनी स्वत: लिहिलेले विचार आपणास वाचण्यास मिळतील.  
 
भगतसिंग यांनी लाहोर मध्यवर्ती कारागृहात ४०४ पानी डायरी लिहिली. डायरीतील प्रत्येक पानातून त्यांचे जाज्वल्य देशप्रेम दिसून येते. स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहताना त्यांनी तुरुंगात घालवलेल्या काळातील प्रत्येक क्षण या डायरीत प्रतिबिंबित होतो. भगतसिंगांनी तुरुंग प्रशासनाकडे डायरी मागितली होती. त्यात सर्वकाही ते लिहू इच्छित होते. १२ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांना प्रशासनाकडून  डायरी मिळाली. यात त्यांनी वर्णन केलेला क्रांतिकारकांचा संघर्ष आज इतिहास बनला आहे.  
 
डायरीत महत्त्वाचे काय?  
केवळ २३ वर्षांच्या काळात मोठमोठी कार्ये करणाऱ्या भगतसिंगांच्या कर्तृत्वाची झलक या डायरीत दिसते. सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या या डायरीत इंग्रजी भाषेबरोबरच उर्दू भाषेवरील त्यांची पकड दिसून येते. यात अमेरिकी, रशियन आणि फ्रान्सच्या क्रांतिकारकांबद्दल लिहिले आहे. अमेरिकी कवी जेम्स लॉवेल रसेल यांची “फ्रीडम’ कविता त्यांनी उद््धृत केली आहे.
बातम्या आणखी आहेत...