आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिथरलेला भाजप मला ‘टार्गेट’ करतोय! मायावतींचा आरोप; भाजपविरोधी पक्षांसोबत आघाडीचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये गडबड केल्याचा आरोप केल्यामुळे बिथरलेल्या भाजपने मला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे; परंतु भाजपला रोखण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांसोबत आघाडी करणे आपल्याला वावगे वाटत नाही, असे बसप नेत्या मायावती यांनी म्हटले आहे. 
 
ईव्हीएमवरून मला गोवण्याचे षड््यंत्र केले जात आहे. परंतु हा प्रश्न मी सोडून देणार नाही. लोकशाहीच्या संरक्षणासाठी माझा संघर्ष सुरूच राहील. आमचा पक्ष या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहील. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी कोणत्याही पक्षासोबत हातमिळवणी करण्याची तयारी आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मतदान यंत्रात अशी करामत करून सत्ता काबीज केली, असा आरोप मायावती यांनी केला. 

राज्यात ४०३ पैकी २५० जागांवर ईव्हीएममध्ये गडबड करून ठेवली होती. इतर जागांवर यश मिळेल, असे भाजपला वाटत होते, असा दावा मायावती यांनी केला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बसपच्या पहिल्या मेळाव्यात मायावती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  

धाकट्या भावाकडे  पक्षाचे उपाध्यक्षपद  
माझा धाकटा भाऊ आनंद कुमारकडे मी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद त्याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तो नि:स्वार्थपणे पक्षासाठी काम करेल. खासदार, आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री ही पदे तो स्वीकारणार नाही, अशी घोषणा मायावती यांनी शुक्रवारी मेळाव्यात केली. मला लखनऊमध्ये जास्त वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे दिल्लीत माझी जबाबदारी कोणीतरी कमी करावी यासाठी हा बदल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दर चार-पाच दिवसांना मला दिल्लीवारी करावी लागत आहे. तेथे अध्यक्षांची स्वाक्षरी लागते. पक्षाच्या घटनेनुसार उपाध्यक्षाला तसेच अध्यक्षासारखे अधिकार आहेत. त्यामुळे पक्षाचा पैसा वाचू शकेल, असे त्यांनी सांगितले.  

भाऊ, नातेवाइकांना त्रास  
गेल्या अनेक वर्षांपासून मला व माझ्या जवळच्या नातेवाइकांना खूप काही यातना सोसाव्या लागल्या आहेत. भाजप व कंपनीने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून २०१४ पासून माझ्या भावाच्या विरोधात आयकर, सीबीआय, सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीचा भुंगा लावला आहे, असा आरोप मायावती यांनी केला आहे. भाजपचे नेते खरे प्रामाणिक असतील तर त्यांनी त्यांची बँक खाती व त्याचा तपशील जाहीर करायला हवा, असे आव्हान मायावती यांनी दिले.  

प्रकृती अस्वास्थ्य  
मायावती यांनी पहिल्यांदाच स्वत:च्या प्रकृतीबद्दल जाहीरपणे माहिती दिली. गळ्यातील एक नलिका शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे मला मोठ्या आवाजात बोलण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे, असे मायावती यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...