आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलिगडमध्ये सभा; भाजपच्या झंझावातामुळेच सपा-काँग्रेसची युती : मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलिगड  - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला राज्यसभेत बहुमत मिळेल, अशी भीती वाटल्यानेच राज्यात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे एकत्र आले आहेत. भाजपच्या ‘वादळा’मुळे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना काँग्रेसची मदत घेणे भाग पडले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली.  

अलिगड येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना मोदी यांनी समाजवादी पक्षाच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अखिलेश सरकारने विकासासाठी काहीही केले नाही, असा आरोप करून मोदी म्हणाले की, भाजप सत्तारूढ झाल्यास ‘विकास’ येईल. विद्युत, कायदा आणि सडक (रस्ते) म्हणजे विकास अशी व्याख्या त्यांनी केली.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण येथे आलो होतो, त्या वेळी अर्धे मैदानही भरले नव्हते, असा उल्लेख करून मोदी म्हणाले की, आज मात्र माझ्यासमोर केसरिया सागर आहे. या वेळी भाजपचा ‘झंझावात’ एवढा मोठा आहे  की, आपण उडून जाऊ, अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत आहे. आपण एकटे लढलो तर मोदींना राज्यसभेत बहुमत मिळेल, अशी भीती त्यांना सतावत आहे. उत्तर प्रदेशच्या
लोकांना आता बदल आणि न्याय हवा आहे.  
 
राज्य सरकारने विकासासाठी काहीही केले नाही, अशी टीका करताना मोदी म्हणाले की, या सरकारने भ्रष्टाचार, जातीयवाद आणि घराणेशाही यापैकी काहीही संपवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसेही चुकते केले नाहीत. मुलाखतीसाठी आमदार आणि मंत्र्यांच्या शिफारशी आणण्यासाठी युवकांना लाच मागितली जात आहे. गरिबांना त्यासाठी जमिनी गहाण ठेवाव्या लागत आहेत. विधवांना मिळणाऱ्या पेन्शनमधूनही पैसे घेतले जात आहेत. हे सर्व थांबवण्यासाठीच केंद्र सरकारने पेन्शन आधार आणि बँक खात्यांशी जोडले.  
उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवरही मोदींनी हल्ला चढवला. तुमच्या मुली, बहिणी सूर्य मावळल्यानंतर बाहेर पडू शकतात का? ही गुंडगिरी थांबवायची की नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. गुंडांना संरक्षण देणाऱ्या नेत्यांना उखडून फेका, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.  
 
बसपा युतीत असता तर भाजपचा सफाया झाला असता : आझाद  
गाझियाबाद - बसपा, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली असती तर उत्तर प्रदेशमधून भाजपचा सफायाच झाला असता, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले. कैला भट्टा येथे निवडणूक प्रचारसभेत आझाद बोलत होते. मतदारांनी बसपाला मते देऊ नये, कारण हा पक्ष निवडणुकीनंतर भाजपशी हातमिळवणी करेल, असा दावाही त्यांनी केला. नोटबंदीवरून केंद्र सरकारवर टीका करताना आझाद म्हणाले की, हा निर्णय देशहिताचा नव्हता. लोक त्याच्याविरोधात मते देतील. काँग्रेस-सपा युती राज्यात निर्विवाद बहुमत मिळवेल, असा दावा त्यांनी केला.  
बातम्या आणखी आहेत...