आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीअंतर्गत वादापासून दूर राहा, मुलायमचा अखिलेशला सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मी समाजवादी पार्टीत फूट पडू देणार नाही. अत्यंत भावुक, मात्र निश्चयी स्वरात मुलायमसिंह यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी यासाठी पूर्ण वेळ देईन. मात्र, पार्टीची एकजूट टिकवून ठेवीन.  पार्टीतील वादांपासून अखिलेशने दूर राहावे, असा सबुरीचा सल्ला पित्याने मुलाला दिलाय. सपातील सध्याच्या दुफळीमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्यांच्याशी पार्टी प्रमुख मुलायमसिंह यांनी संवाद साधला. नवी दिल्लीला निघण्यापूर्वी त्यांनी मुख्यालयात ही बैठक घेतली. चुलत भाऊ रामगोपाल हे सपातील फुटीस जबाबदार असल्याचे ते म्हणाले. या वेळी  त्यांचे बंधू शिवपाल यादव मुख्यालयात उपस्थित होते.  
स्पर्धक पक्षाच्या अध्यक्षांची तीन वेळा भेट कोणी घेतली याची बित्तंबातमी आपल्याकडे असल्याचे मुलायम म्हणाले. पिता-पुत्रामध्ये पार्टी अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादाने आज भावनिक वळण घेतल्याचे दिसून आले. यादव कुटुंबातील नेतृत्व वादावरच मुलायम या वेळी बोलले. त्यांना आपल्या मुलाचे आणि सुनेचे ऐकून निर्णय घ्यायचे आहेत. त्यांनी मला भेटावे. मी मुलगा व सुनेला वाचवू शकतो, असे ते रामगोपाल यांना उद्देशून म्हणाले. काँग्रेस युतीच्या तयारीत असून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.  

मला पार्टी अखंड ठेवायची आहे, असेही मी दुफळी माजवणाऱ्यांना सांगितले. मला नवा पक्ष किंवा नवे चिन्हही नकोय. अखिल भारतीय समाजवादी पार्टी (एबीएसपी) आणि मोटारसायकल चिन्ह कोणाला हवे आहे, हे मी जाणतो. दरम्यान, अखिलेश आणि मुलायम यांच्यातील वाद सध्या निवडणूक आयोगासमोर गेला असून सायकल चिन्हासंबंधी १३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

शिवपाल यादवांची केली प्रशंसा : शिवपाल यांनी पार्टी संघटनासाठी खूप कष्ट घेतले, असे मुलायम म्हणाले. अखिलेश यांनी शिवपाल यांना उत्तर प्रदेश प्रमुख पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. मुलायमसिंह यांना मात्र हे मुळीच मान्य नाही. दरम्यान, शिवपाल निवडणुका लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.
 
‘मला फक्त कार्यकर्ते हवे आहेत’
भावुक होऊन मुलायमसिंह म्हणाले की, माझ्याजवळ जे होते ते मी दिले. अखिलेशला उद्देशून ते बोलत होते. माझ्याकडे आता काय शिल्लक आहे? मला फक्त तुम्ही सर्व कार्यकर्ते हवे आहात. अखिलेश दोन वर्षांचा असताना आणीबाणीच्या काळात मी पार्टीची स्थापना केली. अखिलेश यादव मुख्यमंत्री आहेत आणि पुढील मुख्यमंत्रिपदाची धुराही त्यांच्याकडेच दिली जाईल . मग या दुफळी माजवणाऱ्यांचे तो का ऐकत आहे? त्याने स्वत:ला या वादात अडकवू नये. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पार्टी एकजूट ठेवायची असल्याचे मुलायम म्हणाले. काँग्रेसशी युतीच्या शक्यता त्यांनी पूर्वीच फेटाळल्या होत्या.