आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा महिन्यातील तिसरा व सव्वा महिन्यातील पाचवा गुजरात दौरा, विविध प्रकल्प सुरू होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुन्हा गुजरातला भेट देतील. या महिन्यातील त्यांचा हा तिसरा, तर सव्वा महिन्यातील पाचवा गुजरात दौरा असेल. त्यांच्या हस्ते ६१५ कोटी रुपयांच्या सागरी प्रवासी वाहतूक सेवा प्रकल्पाचे उद््घाटन होईल. दिव्यांग मुलांसोबत ते तासभर सागरी प्रवास करतील. वडोदऱ्यात १४ किमी लांब रोड-शोसह विविध कार्यक्रमांतदेखील सहभागी होतील. वडोदरामध्ये ११४० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचादेखील शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल. मोदींची एक जाहीर सभादेखील होईल.  
 
हा सागरी प्रवासी वाहतूक सेवा प्रकल्प दक्षिण गुजरात व सौराष्ट्र यांना जोडणारा आहे. हा मार्ग तयार झाल्यामुळे दोन्ही प्रदेशांतील अंतर कमी झाले आहे. रस्तेमार्गे हे अंतर ३१० किमींचे आहे. ते आता सागरी मार्गे केवळ ३० किमीवर येऊन पोहोचले आहे. पहिल्या टप्प्यात फेरी सेवेच्या माध्यमातून सामान्य नागरिक जहाजाने ये-जा करू शकतील. दुसऱ्या टप्प्यात वाहनांसह ये-जा करता येणार आहे. प्रकल्पाचा कोनशिला समारंभ २०१२ मध्ये मोदींच्या हस्ते झाला होता.  
 
निवडणूक आयोगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतेय केंद्रातील मोदी सरकार : काँग्रेस  
मोदी सरकार निवडणूक आयोगावर आपला प्रभाव टाकून निवडणुकीच्या तारखा लांबणीवर टाकत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. गुजरात प्रदेश अध्यक्ष भरतसिंह सोलंकी म्हणाले, आपल्या प्रभावाच्या जोरावर मोदी सरकारने हिमाचलमधील निवडणुकीची तारीख जाहीर केली. मात्र, गुजरातमध्ये तसे करण्यात आले नाही. सध्याची परिस्थिती पाहता भाजपची घाबरगुंडी उडाली, असे वाटते. शुक्रवारी ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही टीका केली होती. गुजरातमध्ये निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत नेमले आहे आणि मोदी गुजरातमधील अखेरच्या सभेत या तारखा जाहीर करतील, असा खोचक टोला चिदंबरम यांनी लगावला होता.
बातम्या आणखी आहेत...