उडुपी - देशात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांबाबत चिंता व्यक्त करतानाच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज आहे. नजीकच्या काळात त्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली.
कर्नाटकात रविवारी एका सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या कोनशिला समारंभात ते मार्गदर्शन करत होते. अजूनही देशात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे अनेक आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे. परंतु त्यातही मोठी तफावत आढळून येते. देशात सर्वांपर्यंत पोहोच असलेली आरोग्य सुविधा असली पाहिजे. त्याचबरोबर ती परवडणाऱ्या दरातही उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे, असे मुखर्जी म्हणाले. देशात १ हजार ७०० लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी आहे. कोणताही सुशिक्षित समाज ही बाब मान्य करू शकत नाही, असे मुखर्जी म्हणाले. दरम्यान, देशात एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र अलीकडेच डॉक्टर, दवाखाने, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यात वाढ झाली. ही पद्धत योग्य नाही. तुमचा डॉक्टरांवर विश्वास नाही. मग कोणावर आहे ? , असा प्रश्न त्यांनी विचारला. मुखर्जी यांनी उडुपीतील ८०० वर्षे जुन्या श्री कृष्ण मंदिराला भेट दिली.