चंदिगड - हरियाणातील अंबालाचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय त्यांच्या वाहनाची देखभाल दुरुस्ती, इंधन तसेच चालकांचा पगार यावर सुमारे एक वर्षापासून खर्च करत होते. परंतु हे वाहन त्यांच्याकडे नव्हतेच. हे वाहन सामाजिक न्याय व हक्क राज्यमंत्री कृष्णकुमार बेदी यांचे कर्मचारी वापरत होते. कार्यालयाने मागणी करूनही त्यांनी वाहन परत केलेले नव्हते. शुक्रवारी प्रधान सचिव डॉ. अशोक खेमका यांनी बेदी यांना तत्काळ वाहन परत करण्याबाबत खरमरीत पत्र लिहिल्यानंतर काही वेळातच मंत्री बेदी यांनी वाहन अंबाला येथे पाठवून दिल्याचे सांगितले.
यानंतरही वाहनाचा गैरवापर झालेला आढळला तर कारवाईचा इशारा खेमका यांनी दिला आहे. हरियाणातील अनेक घोटाळे उघडकीस आणणाऱ्या खेमका यांनी बेदी यांना लिहिले होते की, वाहन क्रमांक एचआर-७० यू ००६६ सप्टेंबर २०१६ मध्ये अंबाला येथून चंदिगडला मागवण्यात आले होती. ते अद्याप परत केलेली नाही. ते तत्काळ परत करावे.
तुम्ही सरकार आहात, हव्या तेवढ्या गाड्या ठेवू शकता
खेमका यांनी बेदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, राज्यमंत्री असल्याने तुम्हाला मंत्री म्हणून दोन वाहने मिळतात. तरीही कार्यालयीन कामकाजासाठी जास्तीचे वाहन हवे असेल तर सक्षम अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक वाहन मागवून घ्यावे. तुम्ही राज्यमंत्री या नात्याने स्वत: सरकार आहात. पाहिजे तेवढी वाहने वापरा, पण हे वाहन परत करा. कारण अंबाला येथील कार्यालयाच्या कामकाजाचा खोळंबा होत आहे.