चेन्नई - दक्षिण भारताचे दोन सुपरस्टार रजनीकांत व कमल हासन दोघेही रविवारी राजकीय नेत्यांसोबत एका व्यासपीठावर एकत्र आले. दोघेही कानगोष्टी करताना सर्वांना दिसत होते. कमल हासन यांनी राजकारणात येण्याचा इरादा बोलून दाखवला तर रजनीकांत यांनी या विषयावर टिप्पणी केली.
चित्रपटातून राजकारणात आलेल्या तामिळनाडूच्या शिवाजी गणेशन मेमोरियल हॉलच्या उद््घाटन समारंभास दोन्ही दिग्गज कलावंत उपस्थित होते. शिवाजी गणेशन यांना त्यांच्याच मतदारसंघात निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. रजनीकांत यांनी याचा उल्लेख करताना म्हटलेे, राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर फक्त नाव, प्रसिद्धी आणि पैसाच कामी येत नाही. तर यापेक्षाही वेगळे काही असावे लागते. हे केवळ जनतेलाच कळते. मला निश्चितपणे काहीच सांगता येणार नाही.
रजनीकांत म्हणाले, कदाचित कमल हासनला ठाऊक असेल. दोन महिन्यांपूर्वी जर मी त्याला विचारले असते तर त्याने सांगितले असते. आता विचारले तर तो म्हणेल, माझ्यासोबत आलास तरच सांगेन! यावर उपस्थितांत हशा उसळला.
तत्पूर्वी कमल हासन याने शनिवारी एका टीव्ही कार्यक्रमात राजकारणात येण्याचा इरादा बोलून दाखवला. देशाची सेवा करताना मृत्यूलाही सामोरे जाण्याची तयारी आहे, असे तो म्हणाला होता. राजकीय पक्ष स्थापन करण्याचीही इच्छा त्याने बोलून दाखवली आहे. तामिळनाडूच्या राजकारणात चित्रपट कलावंतांच्या नावाचा मोठा दबदबा आहे. सुरुवातीला एमजीआर (एम. जी. रामचंद्रन), त्यानंतर जयललिता यांची उदाहरणे आहेत. आता कमल हासन यांच्याही नावाची चर्चा आहे. रजनीकांतबद्दल उत्सुकता आहे.