आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:चे अपयश लपवण्यासाठी पाकशी युद्ध शक्य मायावतींचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आझमगड- जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे सरकार पाकिस्तानशी युद्धदेखील करू शकते, असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे.

आझमगडमध्ये मायावती यांची रविवारी जाहीर सभा झाली. त्यावेळी मायावती यांनी राज्यातील सत्ताधारी समाजवादी पार्टी, भाजपचाही समाचार घेतला. राज्याच्या पूर्वेकडील प्रदेशाने मुलायम सिंह यांची निवड केली. जेणेकरून प्रदेशाचा विकास होईल, असे त्यांना वाटले होते. त्यामुळेच ते २०१४ मध्ये आझमगड मैनपुरी मतदारसंघातून विजयी झाले होते. परंतु राज्याला काहीही मिळाले नाही. केंद्र राज्यातील सरकारांनी जनतेची उपेक्षाच केली आहे. आता केंद्र सरकार काश्मीरवरून युद्धही करू शकते. हा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. खरे तर दोन्ही सरकारने आश्वासनांची पूर्तता करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहेत. राज्यातील जनता मात्र हुशार आहे. त्यांना भाजपचा कावा समजतो. ‘अच्छे दिन’च्या भूलथापा देण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र वाईट दिवस आले आहेत. भाजप केवळ हिंदू-मुस्लिमांत संघर्ष पेटवून दंगली घडवण्याचे काम करतात. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा मायावती यांनी दिला.

सपाचे लोक गुंड आणि माफिया
भाजपचे लोक दलितविरोधी आहेत. सपामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सत्ताधाऱ्याच्या जीवावर गुंड माफियांना प्रोत्साहन दिले जात आहे. परंतु जनतेने बसपाच्या हाती सत्ता दिल्यास कायद्याचे राज्य आणू, असे आश्वासन मायावती यांनी दिले. बसपने ‘टाकून दिलेल्यां’ना आश्रय देण्याचे काम सध्या भाजपने सुरू केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

भ्रष्टाचार आणखी वाढला
भाजपच्या कार्यकाळात भ्रष्टाचार आणखीनच वाढला. काँग्रेसपेक्षा तो जास्त झाला आहे. व्यापमं घोटाळा, विजय मल्याचे प्रकरण ही त्याची उदाहरणे आहेत. वास्तविक सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते. १०० दिवसांत आणू, अशी घोषणा मोदींनी केली होती. आता ते विसरून काँग्रेसच्या वाटेवरून भाजपची वाटचाल सुरू झाल्याचा आरोपही मायावतींनी केला.

पूर्वेकडील आझमगडसह १० मतदारसंघावर समाजवादी पार्टीचे प्राबल्य आहे. सपाचा हा बालेकिल्ला भेदण्यासाठी मायावतींनी जोर लावण्यास सुरूवात केली आहे. पुढील वर्षीच्या प्रारंभी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने मायावतींनी रविवारी मुलायम यांच्या मतदारसंघाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हा प्रदेश दलित तसेच मुस्लिम बहुल मानला जातो.
बातम्या आणखी आहेत...