आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंची ‘भारत भीम यात्रा’ सुरू, ‘जाती तोडो, समाज जोडो’चा दिला नारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यात्रेच्या आरंभीच्या कार्यक्रमात आठवले यांच्यासह मान्यवर.
कन्याकुमारी- हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणी देशातील दलित जनतेत मोदी सरकार आणि भाजप यांच्या विरोधात संतप्त भावना आहेत. त्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या ‘कन्याकुमारी ते महू’ अशा ‘भारत भीम यात्रेला’ मंगळवारी प्रारंभ झाला.

तीन महिन्यांत २५ राज्यांतील २५० पेक्षा जास्त शहरांचा प्रवास करणाऱ्या या यात्रेचा लाभ आठवले यांना मंत्रिपद मिळण्यात होतो की भाजपला दलितविरोधी छबी पुसण्यात होतो, याकडे आता निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्त आठवले यांनी ही यात्रा सुरू केली आहे. यात्रेचा समारोप बाबासाहेबांच्या जन्मगावी महू (मध्य प्रदेश) येथे २४ एप्रिल रोजी होईल. भारत भीम यात्रेनिमित्त आठवलेंसाठी स्वतंत्र समता रथ बनवण्यात आला असून तो पूर्णपणे एसी आहे. दोनशे कार्यकर्ते यात्रा काळात रथासोबत असतील. प्रत्येक शहरात आठवले यांची सभा होईल. यात्रा सुरू झाली त्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि मध्य प्रदेशातील रिपाइंचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. ही यात्रा ‘जाती तोडो, समाज जोडो’ हा संदेश घेऊन निघाली आहे. देशातील वाढता जातीयवाद थांबावा, समता प्रस्थापित व्हावी यासाठी भारत भीम यात्रा काढली आहे. रिपाइंची भाजपसोबत केवळ राजकीय युती आहे. युती वैचारिक नाही, त्यामुळे रिपब्लिकन पक्ष भाजपचा गुलाम नाही. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.

स्मारकाची मागणी
कन्याकुमारीत स्वामी विवेकानंद, संत तिरुवेलुरू, महात्मा गांधी आणि राजीव गांधी यांची स्मारके आहेत. कन्याकुमारीच्या हिंद महासागरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्मारक करावे, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.