आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोटच्या श्रीनाथने केली स्टेव्हियाची निर्मिती, देशातील मधुमेहींसाठी दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- उसापेक्षा ३०० पट गोड ‘स्टेव्हिया’ वनस्पतीचा अभ्यास प्रकल्प अकोटच्या श्रीनाथ देवानंद मर्दाने या २३ वर्षीय युवकाने यशस्वीरीत्या पूर्ण करून भारतातील मधुमेह रोग्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. दक्षिण अमेरिकेत उगवणारी ही वनस्पती पूर्णतः शुगरफ्री म्हणून ओळखली जाते. केंद्र शासनाने भारतात स्टेव्हियावरील संशोधन व शेती करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा या विद्यार्थी संशोधकाने व्यक्त केली आहे.
   
अकोटला वाल्मीकनगरात राहणाऱ्या श्रीनाथ देवानंद मर्दानेने   नाशिकच्या के. के. वाघ कॉलेज अॉफ अॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमधून नुकतेच बीएसस्सी (अॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी) या पदवीपर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. त्याने अंतिम वर्षाचा अभ्यास करत असताना स्टेव्हिया निर्मितीचा आव्हानात्मक अभ्यास प्रकल्प स्वीकारला होता. स्टेव्हिया वनस्पती केवळ दक्षिण अमेरिकेतच उगवते. भारतात तिच्या वाढीला पोषक वातावरण नसल्याने तिची लागवड करण्याचा फारसा प्रयत्न कोणी केला नाही. श्रीनाथ मर्दानेने ही वनस्पती महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तीन महिने सातत्यपूर्ण निरीक्षणे नोंदवून एका बाटलीत मायक्रो प्रोपोगेशन लॅब कंडिशनमध्ये सुमारे ८० ते ९० टक्के वाढवली. त्यासाठी त्याने वनस्पतीच्या विविध शाखांवर संप्रेरकाद्वारे (हार्मोन्स) प्रक्रिया केल्या. वनस्पतीच्या प्रत्येक शाखेवर वेगवेगळी प्रक्रिया करून ज्या शाखेत जास्त वाढ दिसून आली. तेच सूत्र अवलंबून या वनस्पतीची जवळपास पूर्ण वाढ करण्यात यशस्वी झाल्याचे त्याने सांगितले. त्याचे हे संशोधन राजस्थानातील जोधपूर येथील रीडर सेल्फ या संस्थेने तसेच एनव्हायर्नमेंटल सायन्स या नेट प्रकाशन संस्थेनेही प्रकाशित केले आहे. कृषी खात्याने ग्रीन हाऊसमध्ये स्टेव्हियाची रोपे विकसित करून ही आधुनिक शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले तर भारतात औषध क्षेत्रात क्रांती होऊन मधुमेह रोग्यांसाठी विविध शुगरफ्री औषधे व खाद्यवस्तू तयार करता येतील, असे श्रीनाथने सांगितले. पदवीनंतर श्रीनाथने आयएएसची तयारी सुरू केली आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय वडील देवानंद मर्दाने, भाऊ रोहित, के. के. महाविद्यालयाचे प्राचार्य, मार्गदर्शक   प्राध्यापक यांना दिले आहे.
 
साखरेपेक्षा गोड, तरीही मधुमेहींसाठी उपयुक्त   
स्टेव्हिया वनस्पतीच्या जगात सुमारे २५० प्रजाती अाढळतात. यापैकी स्टेव्हिया रेबउडियाना प्रजातीत नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त आढळते. यालाच हिंदीमध्ये मिठी पत्ती म्हणून ओळखतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवणे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी स्टेव्हिया उपयुक्त मानले जाते.  अमेरिका  आणि युरोपीय संघ देशात स्टेव्हिया वनस्पतीचा वापर फूड अडेटिव्ह म्हणून केला जातो. अनेक दशकांपासून जपानमध्ये स्टेव्हियाचा वापर पदार्थांना गोडी येण्यासाठी केला जात आहे. स्टेव्हियाच्या पानापासून काढलेला अर्क किंवा रसाचा वापर प्रामुख्याने केला जातो.
 
बातम्या आणखी आहेत...