आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुअनंतपुरम - अत्याचाराच्या विरोधात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सज्ज करण्यासाठी केरळचे पोलिस महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व १४ जिल्ह्यांत कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.  

राज्याचे पोलिस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी सांगितले की, ‘कलारी’ आणि ‘कराटे’ यांसारख्या पारंपरिक मार्शल आर्टपेक्षा साधे आणि सोपे स्वसंरक्षण तंत्र महिलांना शिकवण्यात येईल. अगदी अल्प काळात सर्व वयोगटातील महिलांना शिकणे सोपे जावे अशा प्रकारे ते तयार करण्यात आले आहे. बस, रेल्वे तसेच लिफ्ट, एटीएम आणि इतर सार्वजनिक ठिकाणी महिलांना दररोज लैंगिक छळ, अत्याचार, हल्ले यांना सामोरे जावे लागते. असा प्रकार झाल्यास महिलांना स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरेल. अॅसिड हल्ला, साखळी ओढणे, कौटुंबिक हिंसाचार आणि इतर लैंगिक छळ प्रकरणात लढण्यासाठीही हे तंत्र उपयुक्त ठरेल.  
प्रस्तावित प्रशिक्षण केंद्रात ६० तासांचा अभ्यासक्रम असेल. त्यात संरक्षण तंत्रांची माहिती दिली जाईल त्याशिवाय महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्यात महिलांशी संबंधित कायद्यांबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण दिले जाईल तसेच मानसशास्त्रीय टिप्सही दिल्या जातील. तीन लाख रुपये खर्च करून ही प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली जातील. राज्यस्तरीय केंद्र तिरुअनंतपुरम येथे असेल.  

महिला अत्याचारांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी केरळ पोलिसांनी याआधीच पिंक पेट्रोल आणि पिंक बीट सुरू केले आहे. त्यामुळे अशा घटनांना काही प्रमाणात आळा बसला आहे. आता महिलांना स्वसंरक्षण तंत्र प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याने तसेच त्याबाबत जागरूकता मोहीम सुरू होणार असल्याने महिला अत्याचारांच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा बेहरा यांनी व्यक्त केली.
 
फेब्रुवारीपासून सुरू  
पोलिस विभागाने या प्रकल्पासाठी शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि नागरी संघटना यांच्यासाठी प्रशिक्षण-जागृती कार्यक्रम तयार केला आहे. ५०० महिला पोलिसांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या इतर महिलांना हे प्रशिक्षण देतील. ही प्रशिक्षण केंद्रे आगामी फेब्रुवारीपासून सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...