आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागे चूक केली, आता गोव्यात सेनेचा मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - एकेकाळी गोव्यात भाजपला शिवसेनेने मदत केली. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकला. सहकार्य केले नसते तर सेनेचा मुख्यमंत्री केव्हाच झाला असता; परंतु ती सेनेची चूक होती. आता गोव्यात सेनेचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शनिवारी ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करत होते.

पोरवोरिमजवळ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, भाजपला संघटनात्मक विस्तार करण्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मोठी मदत केली होती. भाजप व मगोप हे समान विचारसरणीचे पक्ष आहेत, असे आम्हाला वाटले होते. शिवसेनेने नेहमीच महाराष्ट्रापुरते मर्यादित राहण्याचे ठरवले होते. भाजपला पक्ष विस्तारासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच भाजपचा देशभर विस्तार होऊ शकला. म्हणूनच इतर राज्यांत हस्तक्षेप नको, अशी भूमिका पक्षाने ठेवली होती. परंतु त्या वेळी भाजपला मदत केली नसती तर भाजप किंवा मगोपशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, शिवसेना गोव्यात संघ नेते सुभाष वेलिंगकर यांच्याशी आघाडी करून २० जागी निवडणूक लढवणार आहेत. आघाडीबाबतची घोषणा लवकरच केली जाणार आहे, सूत्रांनी सांगितले.

ब्रिक्समधून काय साधले ?
पंतप्रधान परदेशातील जुन्या मित्रांबद्दल बाेलतात. परंतु देशातील जुन्या मित्रांचे काय? त्यांना मिळणारी वागणूक पाहून तेदेखील भविष्यात मैत्रीबद्दल विचार करतील. गोव्यात अलीकडेच ब्रिक्स परिषद झाली. त्यात देशोदेशीचे नेते जॅकेट घालून हस्तांदोलन करताना दिसले. मला त्यांच्यावर टीका करायची नाही; परंतु गोव्यात झालेल्या ब्रिक्समधून भारताला काय मिळाले बरे? मला तरी ठाऊक नाही, असा टोलाही ठाकरे यांनी केंद्राला लगावला.

"पारसेकर सरकार पोर्तुगीजांपेक्षा वाईट’
गोव्यातील विद्यमान भाजप प्रणीत लक्ष्मीकांत पारसेकर यांचे सरकार पोर्तुगीज सरकारहून अधिक वाईट आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी केली. आम्ही हे सरकार मुळासकट उखडून फेकण्यासाठी येथे आलो आहोत. २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत या सरकारला सत्तेवरून खेचा. जनतेला सेनेचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
बातम्या आणखी आहेत...