आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी तरुणांना चकमकीत मारू नये, मुख्य प्रवाहात आणावे - मेहबूबा मुफ्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - राज्यातील तरुणांना घर सोडून जावे लागत आहे. पोलिसांनी त्यांना चकमकीत ठार करू नये. त्यांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल याचा प्रयत्न करावा, असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

राज्यात सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर मेहबूबा यांनी हे आवाहन केले आहे. मेहबूबा म्हणाल्या, शस्त्र हाती घेतलेले तरुण घरापासून भरकटलेले आहेत. त्यांना दहशतवादी संघटनेत सामील व्हायचे आहे. ही मुले स्थानिक आहेत. पोलिसांना माझी एक विनंती आहे. त्यांनी अशा भरकटलेल्या तरुणांना चकमकीत ठार करण्याऐवजी त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील. त्यांना बॅट, बॉलसह चांगले शिक्षण मिळावे. त्यांना बंदूक मिळू नये.

पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात मेहबूबा शुक्रवारी बोलत होत्या. झिवान येथील पोलिस संकुलात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेहबूबा म्हणाल्या, बंदुकीचा धाक दाखवून किंवा दगडफेकीतून चर्चा होऊ शकत नाही. राज्यातील परिस्थिती निवळल्यानंतर अफस्पा या काळ्या कायद्याला रद्द करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील. त्यासाठी पहिल्यांदा तशा प्रकारचे वातावरण तयार केले पाहिजे. म्हणूनच चर्चेसाठी तयारी दर्शवावी. अन्यथा मार्ग निघणे कठीण आहे.
लहान मुलांची ढाल कशासाठी ?
एका बारा वर्षांच्या मुलाने दगडफेक केली होती. त्या मुलाला आपण दगड का मारत आहोत याचे ज्ञान असेल? खरे त्याच्या मागे काही लोक आहेत. काहींची आेळख पटलेली आहे. काहींचा लवकरच छडा लावला जाईल. हेच लोक लहान मुलांना अशा प्रकारच्या छावण्यात ढकलत आहेत. तुम्ही लहान मुलांची ढाल कशासाठी करत आहात? हा प्रश्न दगडफेक, गोळीबार चकमकीतून सुटणार नाही हे लक्षात घ्या, असे आवाहन मेहबूबा यांनी केले.

पाकिस्तानने सीमापार दहशतवाद थांबवावा
पाकिस्तानने सीमापार दहशतवाद थांबवावा. त्यानंतरच द्विपक्षीय चर्चा शक्य होऊ शकेल, असे मेहबूबा यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मेहबूबा यांनी दोन्ही देशांतील शांती चर्चेला गती मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्या म्हणाल्या, अटलबिहारी वाजपेयी यांच्या धोरणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. परंतु घुसखोरी ही काही लपलेली गोष्ट नाही. त्यामुळेच सीमेवर चकमकी होतात. म्हणूनच पाकिस्तानने घुसखोरी रोखतानाच दहशतवादाला पाठिंबा देणे तत्काळ थांबवावा.
बातम्या आणखी आहेत...