आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे निलंबन मागे, आंदोलन सुरूच: HCUतील 13 प्राध्यापकांचे राजीनामे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाने (एचसीयू) पीएच.डी. करत असलेल्या चार दलित विद्यार्थ्यांचे निलंबन गुरुवारी मागे घेतले असले तरी एचसीयूच्या परीक्षा नियंत्रकासह १३ प्राध्यपकांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिल्याने हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे.

एचसीयूतर्फे या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात रोहित वेमुला चक्रवर्तीसोबतच निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून रोहितने मागच्या रविवारी आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूनंतर हैदराबाद केंद्रीय विद्यापीठावर सर्व बाजूंनी दबाव वाढला आहे. या प्रकरणाला राजकीय रंगही चढला असून त्यामुळे देशाचेच राजकारण तापले आहे.

प्रशांत, विजय कुमार, शेशैया आणि सुनकन्ना अशी निलंबन मागे घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाच्या गुरुवारी सकाळी झालेल्या बैठकीत या विद्यार्थ्यांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. तत्पूर्वी, विद्यापीठातील १३ प्राध्यापकांनी प्रशासकीयपदांचे राजीनामे देण्याची घोषणा केली. त्यात परीक्षा नियंत्रक, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि मुख्य वॉर्डनचाही समावेश आहे. या सर्वांकडे या पदांचा अतिरिक्त कार्यभार आहे. विद्यापीठ परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ अनुसूचित जाती- जमातीच्या प्राध्यापकांनी हे पाऊल उचलले. रोहितच्या आत्महत्येला जबाबदार लोकांवर कारवाई करा, रोहितच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या, त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या आणि विद्यापीठाचे कुलगुरु अप्पा राव यांना बडतर्फ करा, अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.
हा निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु पुरेसा नाही. रोहित आमच्यात नसल्यामुळे आम्ही त्याचा आनंदोत्सव साजरा करू शकत नाही. सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही संघर्ष सुरुच ठेवणार आहोत,निलंबन मागे घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक विजयने सांगितले. तर निलंबन मागे घ्या, ही विद्यार्थ्यांची पहिली मागणी होती, ती पूर्ण करण्यात आली आहे. आता कुलगुरू आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करून उर्वरित मागण्यांवर तोडगा काढतील, असे एचसीयूचे अधीष्ठाता प्रकाश बाबू यांनी म्हटले आहे.

मोदींनी देशाची माफी मागावी
दिशाभूल आणि गैरवर्तन केल्याने मंत्री स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रय यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी. निलंबनाचा निर्णय सदोष आणि भाजप- अभाविप व विद्यापीठ प्रशासनाची मिलीभगत होता, हे सिद्ध होते, असे काँग्रेसने म्हटले आहे.

स्मृती इराणींनी दिशाभूल केली
निलंबनाची कारवाई करणाऱ्या विद्यापीठ उपसमितीचे प्रमुख ज्येष्ठ दलित प्राध्यापकच होते, वॉर्डनही दलितच होते, असे चुकीचे सांगून मंत्री स्मृती इराणी यांनी दिशाभूल केली आहे. वस्तुत: विपिन श्रीवास्तव हे सवर्ण प्राध्यापक या समितीचे अध्यक्ष होते. वॉर्डनने फक्त निर्णयाची अंमलबजावणी केली. परंतु इराणींनी विपर्यास केला. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राजीनामे देत आहोत, असे एचसीयूमधील १३ दलित प्राध्यापकांनी निवेदनात म्हटले आहे.

विद्यापीठाचा निर्णय विद्यार्थ्यांना अमान्य
एचसीयूत आंदोलक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कार्यकारी मंडळाचा निर्णय फेटाळला असून या निर्णयाची प्रतही जाळली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रय व कुलगुरू अप्पा राव यांची हकालपट्टी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
स्मृती इराणींविरुद्ध एफआयआर नोंदवा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी एचसीयूला भेट दिली. स्मृती इराणी व बंडारूंना हाकलावे, इराणी जातीचे राजकारण करत असल्याने एफआयआरमध्ये त्यांचेही नाव घालण्याची मागणी केजरीवाल केली.