आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वासदर्शक ठरावाला द्रमुकचे हायकोर्टात आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई  - तामिळनाडू विधानसभेत शनिवारी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील विश्वासदर्शक ठराव निरर्थक ठरवावा, अशी मागणी करणारी याचिका विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने सोमवारी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली.  

द्रमुकतर्फे अॅड. आर. षण्मुगसुंदरम यांनी ही याचिका दाखल केली आणि त्यावर त्वरित सुनावणी करण्याची मागणी केली. कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती हुलुयादी जी. रमेश आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ही सुनावणी मंगळवारी घेण्याचे आदेश दिले.  
मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी गेल्या शनिवारी २४३ सदस्य संख्या असलेल्या सभागृहात १२२ विरुद्ध ११ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. ठरावावर गुप्त मतदान घेण्याची द्रमुकची मागणी विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी फेटाळून लावल्यानंतर सभागृहात प्रचंड रणकंदन माजले होते. माइक तोडण्यात आले होते, खुर्च्याही फेकण्यात आल्या होत्या. कागद भिरकावण्यात आले होते. त्यामुळे द्रमुकच्या सदस्यांना मार्शलतर्फे बाहेर काढण्यात आले होते, तर द्रमुकच्या सहकारी पक्षांनी सभात्याग केला होता. त्यानंतर झालेल्या मतदानात पलानीस्वामी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव १२२ विरुद्ध ११ मतांनी मंजूर झाला होता. 
तामिळनाडूतील दारूची 500 दुकाने होणार बंद  
चेन्नई  राज्यात सरकारमान्य दारूची किरकोळ विक्री करणारी ५०० दुकाने बंद करण्यात येतील, अशी घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी पलानीस्वामी यांनी सोमवारी केली. राज्यात टप्प्याटप्प्याने दारूची दुकाने बंद करण्याचे आश्वासन अद्रमुकच्या दिवंगत सर्वेसर्वा जयललिता यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जयललिता यांनी मे २०१६ मध्ये राज्य सरकारची मान्यता असलेली देशी दारूची ५०० दुकाने बंद केली जातील, अशी घोषणा केली होती याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. पलानीस्वामींनी मुख्यमंत्री म्हणून ज्या पहिल्या ५ आदेशांवर स्वाक्षरी केली, त्यात या आदेशाचा समावेश आहे. 
बातम्या आणखी आहेत...