आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकात्यातील संघ मेळाव्यास उच्च न्यायालयाची परवानगी, आज आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मकरसंक्रांती मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी उच्च न्यायालयाने त्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होणारा मेळावा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.
ब्रिगेड परेड मैदानावर संघाच्या मेळाव्याचे आयोजन करण्याची परवानगी मागण्यात आली होती. परंतु पोलिसांनी आयोजकांना परवानगी देण्यास नकार दिला होता. भुकैलाश पार्कवरदेखील परवानगी मागण्यात आली होती. हे मैदान कोलकाताच्या पश्चिमेकडील भागात आहे. दोन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणी मेळावा घेण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु दोन्ही ठिकाणी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. हा मेळावा मकरसंक्रांतीच्या दिवशीच आयोजनाची वार्षिक परंपरा आहे. तिथीनुसार हा मेळावा आयोजित केला जातो. इतर दिवशी तो आयोजित करता येऊ शकत नाही किंवा तो पुढेही ढकलता येऊ शकत नाही, असे अॅडव्होकेट जनरल जयंत मित्रा यांनी न्यायमूर्ती जॉयमाल्यो बागची यांच्या पिठासमक्ष सांगितले. ब्रिगेड मैदानावर मेळाव्याला परवानगी देण्यास काहीही हरकत नाही. कारण मैदान लष्कराच्या ताब्यात आहे. मेळाव्यासाठी आवश्यक असलेली लष्कराची परवानगी अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी ती नाकारण्याची गरज नाही, असे आयोजकांच्या वकीलांचे म्हणणे होते. न्यायमूर्ती बागची यांनी कोलकाता पोलिस आयुक्तांना २४ तासांत परवानगी देण्याचे आदेश दिले.

प्रत्येकाची नोंद ठेवा
न्यायमूर्ती बागची यांनी संघाच्या कोलकाता महानगर शाखेला काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार शाखेला एका शपथपत्र द्यावे लागणार आहे. मेळाव्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी व आेळखपत्राची नोंदणी कटाक्षाने करण्यात यावी. आेळखपत्राशिवाय कार्यक्रमस्थळी परवानगी देऊ नका, असे कोर्टाने बजावले आहे. कार्यक्रम शनिवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत होईल. 
 
ममतांचे आदेश
नोटाबंदीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकरणांत तृणमूल काँग्रेसच्या अनेक खासदार व आमदारांवर अटकेची कारवाई झाली आहे. त्यामुळे ममता अगोदरच केंद्र व संघावरही नाराज आहेत. त्यातूनच ममताच्या इशाऱ्यावर पोलिसांनी संघाच्या मेळाव्याला परवानगी नाकारल्याचे सांगण्यात येते. केंद्रावर ममतांनी टीकेची झोड उठवली आहे.