आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळचे सर्वात श्रीमंत मंत्री थॉमस चंडी यांचा राजीनामा; अतिक्रमण करून रिसॉर्ट बनवल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवअनंतपुरम- जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप असलेले केरळचे वाहतूकमंत्री थॉमस चंडी यांनी बुधवारी राजीनामा दिला. ९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले ते केरळ मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत सदस्य होते.  


अलाप्पुझाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडेच राज्य सरकारला अहवाल दिला होता. त्यात चंडी यांनी जमिनीवर अतिक्रमण करून रिसॉर्ट बनवल्याचा आरोप केला होता. त्याच्याविरोधात चंडी यांच्यातर्फे दाखल केलेली याचिका मंगळवारी केरळ उच्च न्यायालयाने खारिज केली होती. चंडी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. केरळमधील सत्तारूढ आघाडीतील दुसरा सर्वात मोठा घटक असलेल्या भाकपने चंडी यांच्याविरोधात मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यानंतर काही तासांनीच चंडी यांच्या राजीनाम्याची घोषणा झाली.   


सूत्रांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात चंडी हे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात जातील. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागा सध्या रिक्त ठेवली जाईल. चंडी हे आधी उद्योगपती होते. त्यानंतर ते राजकारणात आले. दीड वर्षात एलडीएफ सरकारमधून राजीनामा देणार ते तिसरे मंत्री ठरले आहेत. भाजपचे नेते ई. पी. जयराजन यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला होता. राष्ट्रवादीचे नेते ए. के. ससिंद्रन यांचा मार्च महिन्यात एका महिलेशी दूरध्वनीवर अश्लील चर्चा केल्याच्या आरोपानंतर पद सोडावे लागले होते. ससिंद्रन यांच्या राजीनाम्यानंतर ८ महिन्यांपूर्वी चंडी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. राज्यात राष्ट्रवादीचे फक्त २ आमदार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष टी. पी. पीतांबर मास्टर पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर चंडी यांचे राजीनामा पत्र मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याकडे सोपवले.


चंडी यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखील यूडीएफ आणि भाजपने अलीकडेच निदर्शनेही केली होती.   

भाकपच्या ‘आडमुठ्या’ भूमिकेमुळे राजीनामा  

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर चंडी अलाप्पुझाला रवाना झाले. एका मल्याळम दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा मागितला नव्हता. राजीनामा देण्यासारखी परिस्थितीही नव्हती. पण भाकपच्या ‘आडमुठ्या’ भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांनी मला फेरविचार करण्यास सांगितले. आम्ही तुमचा राजीनामा मागत नाही, पण तुमच्या नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय घ्या, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.  

बातम्या आणखी आहेत...