आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गांवर टोलवसुली राहणार सुरूच, पाच वर्षांत ८२,००० किमीचे जलमार्ग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- देशात राष्ट्रीय राज्यमार्गांवर सुरू असलेले टोलनाके पूर्णपणे बंद करून टोलटॅक्स कमी करण्याची शक्यता केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी फेटाळून लावली आहे. चांगले रस्ते तयार करण्यासाठी पैशाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून पथकर पूर्णपणे बंद करता येऊ शकणार नाही; परंतु देशातील सर्व टोल प्लाझा येत्या सहा महिन्यांत "ई-टोल'मध्ये बदलले जातील. तेथे लोक ई - बँकिंग किंवा अन्य मार्गांनी टोल टॅक्स भरू शकतील. त्यामुळे त्यांची वेळेची बचत होईल, असे गडकरी म्हणाले.

येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, देशातील १०१ नद्यांमध्ये जलवाहतूक व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव संसदेत प्रलंबित आहे. पाच वर्षांत ही व्यवस्था पूर्णपणे लागू केली जाईल. या नद्यांमधून तब्बल ८२,००० किलोमीटरचा मार्ग तयार केला जाईल. त्याशिवाय पुढील सहा महिन्यांत सी-प्लेनही सुरू केले जातील. मुंबईच्या समुद्रात तीन महिन्यांत बसेस सुरू होतील.
अत्याधुनिक बॅटरीवरही काम
परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक वाहनांची योजना तयार केली आहे. दोन वर्षांत बसेस, कार व दुचाकी वाहनांत अत्याधुनिक बॅटरीजचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या बॅटरीजची सध्या इस्रोकडून तपासणी सुरू आहे, असेही त्यांनी
स्पष्ट केले.
पुलाबाबत ऑक्टोबरमध्ये चर्चा
श्रीलंकेचे पीएम रानिल विक्रमसिंघे यांनी भारत - श्रीलंकेदरम्यान पूल निर्माणाचेे वृत्त फेटाळून लावले होते. अशा पुलाबाबत भारताशी कुठलाही करार झालेला नसल्याचे स्पष्टीकरण विक्रमसिंघे यांनी श्रीलंकन संसदेत दिले होते, परंतु गडकरींनी नेमके त्याविरुद्ध भाष्य केले. गडकरी म्हणाले, या पुलासाठी ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांदरम्यान उच्चस्तरीय बैठक होणार आहे. आशियाई विकास बँकेच्या मदतीने हा पूल बांधला जाणार आहे.
दीड लाख किमीचा राष्ट्रीय मार्ग
गडकरींनी दावा केला की वर्षभरात राष्ट्रीय महामार्गांची लांबी ९६ हजार किलोमीटरवरून वाढून दीड लाख किलोमीटर करण्यात येणार आहे. त्याचा २ टक्के फायदा विकास दरात होईल. एकूण २८१ किलोमीटरचे रस्ते महामार्ग प्रस्तावित असून त्यावर ३ लाख ८० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या रस्ते निर्मितीत कोणतेही अडथळे नाहीत. सध्या कमीत कमी १०० योजना मंजुरी प्रक्रियेत आहेत. त्याच बरोबर देशात २५ ऑक्टोबरपासून सिमेंटचे रस्ते लाँच केले जातील. त्यासाठी ९५ लाख टन सिमेंटचा साठा तयार करण्यात आला आहे.
वाराणसी - हल्दिया मार्ग :
पश्चिम बंगालच्या हल्दियाहून वाराणसीपर्यंतचा बहुप्रतीक्षित १६२० किलोमीटर लांबीचा जलमार्ग पुढील वर्षी सुरू होईल. उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारने या मार्गाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता. तो गडकरींनी फेटाळून लावला.