आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात 400-500 पेक्षा जास्त पाहुणे नको, जेवणात 7 व्हेज, नॉनव्हेज व 2 स्वीट डिश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- भरमसाट खर्चाचे विवाह... पाहुण्यांना जेवणासाठी पंचपक्वान्न... शेकडो पाहुणे, वऱ्हाडी आणि आकर्षक सजावटीचा सोहळा... असे आजकाल विवाह समारंभात दिसणारे दृश्य जम्मू-काश्मीरमध्ये पाहावयास मिळणार नाही. राज्य सरकारने येथे सर्व सरकारी व खासगी आयोजकांना अशा समारंभांवर वायफळ खर्च करण्यावर बंदी आणली आहे.
 
एवढेच नव्हे तर कार्यक्रमासाठी किती पाहुण्यांना निमंत्रित केले जावे, कोणत्या पदार्थांचा जेवणात समावेश असावा याची यादी सरकारनेच तयार केली आहे. त्यामुळे लग्नाचा खर्च करताना सरकारचाही विचार करावा लागेल. राज्याचे ग्राहक विभागाचे मंत्री झुल्फिकार अली यांनी मंगळवारी याबाबतचा आदेश जारी केला. यामुळे लग्नखर्चावर बंधन आणणारे जम्मू-काश्मीर देशातील पहिले राज्य ठरणार आहे.  
 
अली म्हणाले, अन्नाची नासाडी व बडेजाव दाखवण्यासाठी होणारा खर्च रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची कडक अंमलबजावणी होईल. नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कलम १३३ व १८८ नुसार कारवाई केली जाईल. त्यात कुणालाही दयामाया दाखवली जाणार नाही. ज्यांच्या घरात येत्या काही दिवसांत लग्नकार्य आहे अशांनी काय करावे, या प्रश्नावर अली म्हणाले, त्यांच्याकडे ४० दिवसांचा अवधी असून त्यांनी त्याअनुरूप व्यवस्था करावी.
 
आता असे करावे लागेल नियोजन  
- मुलीच्या लग्नात ५००, मुलाच्या लग्नात ४०० आणि लहान कार्यक्रमात १०० पेक्षा जास्त पाहुणे बोलावता येणार नाहीत. निमंत्रण पत्रिकेसोबत सुका मेवा, मिठाई वा भेटवस्तू पाठवू शकत नाही.  
- मांसाहारीच्या ७ व शाकाहारीच्या ७ डिशेसपेक्षा जास्तीच्या पदार्थांना मनाई. मिठाई व फळांचे दोनपेक्षा जास्त स्टॉल्स ठेवू शकत नाहीत.  
 
- अॅम्प्लिफायर्स(डीजे, ऑर्केस्ट्रा) आणि लाऊडस्पीकर्स वाजवू शकत नाहीत. आतषबाजीही करू शकत नाहीत.  
 
- कच्च्या, शिजलेल्या अन्नाची नासाडी करू नये. शिल्लक राहत असेल तर फेकू शकत नाहीत. गरजू किंवा वृद्धाश्रमांना द्यावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...