चेन्नई - बंगळुरू येथील तरुण महिलेने तामिळनाडूच्या मंत्र्यांच्या पत्रपरिषदेत पोलिसांच्या छळवणुकीला सामोरे जावे लागल्याची तक्रार केली. शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या बसस्टँडवर
आपल्याला शहर पोलिसांनी हीन वागणूक दिल्याची तक्रार तिने पत्रपरिषदेत केली. या महिलेच्या अकस्मात आगमनाने आणि आरोपांमुळे पत्रपरिषद आयोजकांची चांगलीच धांदल उडाली. राज्याचे वाहतूकमंत्री एम.आर. विजयभास्कर यांची पत्रपरिषद एका वाहिनीवर थेट प्रक्षेपित होत होती. त्यात ही महिला अचानक आली. आपण रिसर्च स्कॉलर असल्याचे तिने सांगितले. तिने इंग्रजीत जोरजोराने आपली तक्रार मांडणे सुरू केले. त्यामुळे उपस्थित अचंबित झाले.
स्पेशल तिकीट बुकिंग काउंटरच्या उद््घाटनापूर्वी या पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महिलेच्या अचानक येण्याने उद््घाटनानंतर मंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. सदरील महिलेच्या तक्रारीची त्वरित चौकशी करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. पोंगल सणानिमित्त सार्वजनिक वाहतुकीवर अतिरिक्त ताण पडतो. त्यासाठी वेगळ्या तिकीट काउंटरची सुविधा करण्यात आली असल्याचे विजयभास्कर यांनी माध्यमांना सांगितले.
मायग्रेनमुळे आपण खाली पडलो, पोलिसांनी लाठीने हुसकावले
मला मायग्रेनचा अटॅक आला. उलटी झाली. चक्कर आल्यासारखे वाटल्याने मी बसस्थानकावर जिथे उभी होते तेथेच पडले. १० मिनिटे थांबून निघावे असा विचार केला. मला चालवेना. अशा स्थितीत गस्त पथकातील पोलिसांनी मला दंडुक्याने हुसकावले. महिला पोलिसांनी कस्सून चौकशी केली. मी का पडले आहे, असे दरडावून विचारण्यात आले. आपले नाव या महिलेने माध्यम प्रतिनिधींना अन्नपूर्णा असे सांगितले आहे.
एकट्याने प्रवास कसा करावा ?
एकट्या महिलेला बंगळुरूमध्ये प्रवास करणे शक्य नाही. चार पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्याला छळले. त्यात दोन महिला कर्मचारीही होत्या. कोयामबेडू बस स्टँडवर आपल्याला हीन वागणूक दिली गेली, अशी आरोपांची सरबत्तीच या महिलेने सुरू केली. त्यानंतर तिने लिखित तक्रार मंत्र्यांसह असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडे दिली. विजयभास्कर यांनी या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी अाश्वस्त केले.