आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar Close Aid Parveen Enter In Aam Adami Party

नितीशकुमारांच्या निकटवर्तीय परवीन आम आदमी पार्टीच्या तंबूत,मंत्रीपदाचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा / नवी दिल्ली - बिहारमधील माजी समाजकल्याणमंत्री व जेष्ठ मुस्लीम विचारवंत, नेते सय्यद शहाबुद्दीन यांच्या कन्या परवीन अमानुल्लाह यांनी अखेर गुरुवारी आम आदमी पार्टीमध्ये रीतसर प्रवेश केला. नितीशकुमार सरकारविषयी भ्रष्टाचारासंदर्भात अनेक तक्रारी होत्या. त्यामुळेच मी एक महिन्यापासून आपच्या संपर्कात होते. शेवटी याच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे 55 वर्षीय परवीन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. बिहारमध्ये ‘आप’ची कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे, परंतु नेत्याच्या पातळीवर ‘आप’ कोणताही राजकीय चेहरा मिळालेला नव्हता. परवीन यांच्या प्रवेशामुळे बिहारच्या राजकीय आखाड्यात ‘आप’चे महत्त्व वाढेल. लवकरच पक्षाकडून समन्वयक समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यात 55 वर्षीय परवीन यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीतही दिसेल, असे सांगितले जाते.
परवीन यांच्याशी ‘भास्कर’ने केलेली ही बातचीत.
भास्कर : समाजसेवा आणि लोकसभा निवडणुकीचा पर्याय खुला ठेवला आहे. चांदनी चौक की किशनगंजमधून लढणार?
परवीन : मी माझे पत्ते दोन-चार दिवसांनी उघडेल. एवढे खरे की बिहार सोडणार नाही. किशनगंजबद्दल सध्या काही सांगू शकत नाही. दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून उमेदवार होण्याचा अजूनतरी विचार केलेला नाही. किशनगंजला मी चांगल्या प्रकारे ओळखते. किशनगंजमधून परवीन यांचे वडील सय्यद शहाबुद्दीन लोकसभा सदस्य होते.
सरकारमध्ये काय अडचण होती?
व्यवस्थेमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. या व्यवस्थेमध्ये काम करणे कठीण झाले होते. लोक तक्रार करतात तेव्हा तक्रार करणा-यालाच दोषी ठरवले जाते.
केजरीवालच का ?
माझा निर्णय बिहारच्या कल्याणाचा आहे. भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसवर काहीही बोलायचे नाही. केजरीवाल यांच्यासोबत काम केले आहे, हे खरे आहे. ते माझ्या निमंत्रणावर अनेक वेळा बिहारला आले होते. एकदा माझ्यासोबत केजरीवाल मुख्यमंत्र्यांनादेखील भेटले होते.
मंत्रिमंडळात आता केवळ एकच अल्पसंख्याक : गेल्या आठ वर्षांत नितीशकुमार सरकारमधील राजीनामा देणा-या परवीन दुस-या अल्पसंख्याकमंत्री ठरल्या आहेत. अगोदर एनडीए-1 जमशेद अशरफ यांनी राजीनामा दिला होता. आता सरकारमध्ये अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून केवळ शाहिद अली खान हे मंत्री आहेत.
राजीनामा मंजूर
परवीन अमानुल्लाह आणि नितीशकुमार यांच्यातील चर्चा चांगली राहिली. परवीन राजीनामा मागे घेतील, असे वाटत होते. बुधवारी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वेळ मागितला होता. अर्ध्या तासाने निर्णय कळवू, असे सांगितले होते. परंतु निवासस्थानाबाहेर पडताच प्रसारमाध्यमांकडे, मी निरोप घेण्यासाठी आले होते, असे सांगितले. त्यानंतर सभापतींकडे राजीनामा देण्यासाठी निघून गेल्या. त्यानंतर सायंकाळी नितीशकुमार यांनी त्यांना पुन्हा विचारणा केली. तेव्हा परवीन आपल्या निर्णयावर ठाम होत्या. अखेर राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा पाठवण्यात आला. सायंकाळी उशिरा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.