आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नितीश, लालू एक; मांझींना गळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार्‍या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. बिहारच्या निकालातून देशाच्या राजकारणाची दिशा मात्र निश्चित होईल. केजरीवाल यांनी दिल्ली नमो रथ रोखून धरल्यानंतर बिहारमध्येही भाजपच्या रथाचे चाक निखळले जाऊ शकते, अशी आशा विरोधकांमध्ये आहे. या आशेतूनच एकमेकांचे कट्टर विरोधक लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार पुन्हा एकदा लहान आणि मोठ्या भावाच्या रूपात एकत्र आले आहेत. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांचे विलीनीकरण न झाल्यास आघाडी निश्चित होईल, असे मानले जाते. कधीकाळी गैर काँग्रेसवादाचा नारा देणारे समाजवादी पक्ष आता गैर भाजपवादाच्या नावाखाली मोट बांधत आहेत. भाजपनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्र्यांना बिहारचे दौरे वाढवण्यास सांगितले आहे. असे असले तरी भाजप नरेंद्र मोदी यांच्या नावावरच रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.

राज्यात सध्या राजद-जदयू एकत्र आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनाही सोबत घेण्याचे लालू आणि नितीश यांचे प्रयत्न होत आहेत. यातून मागास, अति मागास, दलित, महादलित आणि अल्पसंख्याकांचे एक समीकरण व्हावे, अशी त्यांना आशा आहे. जातीपातीच्या वर्गवारीत अडकलेल्या राज्यात सर्वच पक्षांना आपापल्या जातीची व्होट बँक बळकट केल्याशिवाय पाय पसरणे कठीण आहे.

प्रत्येक पक्ष जात परिषदेतून आपली ताकद दाखवत आहेत. नुकतेच कुशवाहा संमेलन झाले. यामध्ये सम्राट अशोकालाही कुशवाहा म्हणून सादर करण्यात आले. भाजपने संमेलनाचे आयोजन केले हेाते. मागास वर्ग, अति मागास वर्गात विविध जातींचा समावेश करण्याचे आमिष दाखवले जात आहे. सत्ताधारी पक्षांकडून अशी आश्वासने दिली जात आहेत. विरोधक त्याचे स्वप्न दाखवत आहेत. कर्मचारी वर्गाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सरकारी कर्मचार्‍यांना नुकतीच ६ टक्के महागाई भत्त्याची भेट दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडले आणि आपले निकटवर्तीय जीतनराम मांझी यांच्याकडे पदभार सोपवला होता. मांझी यांनी काही दिवस नितीश यांचे एेकून घेतले, मात्र अल्पावधीतच ते स्वत:चे अस्तित्व निर्माण करू लागले. दोघांतील वाद विकोपाला गेल्यानंतर मांझी यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणे भाग पडले.

नितीश यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपद स्वीकारले, मात्र मधल्या काळात बिहारच्या राजकारणात मांझी फॅक्टर उदयास आला. सध्या मांझी राज्याचा दौरा करत असून नितीश यांच्याविरोधात प्रचार करत महादलित वर्गाला आकर्षित करत आहेत. दुसरीकडे, राजद खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनीही राजद-जदयू आघाडीविरुद्ध बिगुल फुंकला आहे. दोघे बंडखोर कोणासोबत लढणार अथवा निवडणुकीनंतर कोणासोबत जाणार हे अद्याप ठरलेले नाही.

भाजपविरोधाच्या नावाखाली होणार्‍या महायुतीत लालूप्रसाद मांझी यांना बरोबर घेऊ इच्छितात. मात्र, जदयूची त्यास आडकाठी आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले. भाजपलाही मांझी यांची सोबत हवी आहे. मांझी यांची आक्रमकता, नितीश कुमार यांच्या सोशल इंजिनिअरिंगचे नुकसान करत आहे. पप्पू यादव राजदच्या यादव मतांची विभागणी करत आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. त्यामुळे भाजप मोदी यांचा चेहरा वापरण्याची रणनीती आखत आहे. प्रदेश मुख्यालयापासून ते जिल्हा कार्यालयापर्यंत तसे नियोजन केले जात आहे. पक्षाने ९३.११ लाख नवीन सदस्य नोंदणी केली आहे. भाजपने केंद्रीय मंत्र्यांना बिहार दौरा करण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी १४ एप्रिल रोजीच्या सभेत झीरो फॉर्म्युला (जदयू + शून्य = शून्य) सांगून कार्यकर्त्यांत उत्साह आणला होता. निवडणुकीतील मुद्देही स्पष्ट झाले आहेत. भाजपने राजद-जदयूला याआधीच जंगलराज २ संबोधले आहे. "जय-जय बिहार', "भाजप सरकार और दलित और किसान नए बिहार ही होंगे शान'ची घोषणा लोकप्रिय झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील काळा पैसा आणणे, महागाई, बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या आश्वासनाच्या मुद्द्यावरून राजद-जदयूने भाजपने घेरले आहे.

जागावाटप अडचणीचे
राजद व जदयूमध्ये जागावाटपाची मोठी समस्या आहे. राजद १४२ जागांवर दावा सांगत आहे. लोकसभेवेळी राजद ३२ जागांवर पहिल्या आणि ११० जागांवर दुसर्‍या क्रमांकावर होता. त्यामुळे जदयूचा हक्क केवळ ३७ जागांवर आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

राजद-जदयू आघाडीचे नेतृत्व अस्पष्ट आहे. निवडणुकीनंतर नेतृत्व ठरावे, अशी राजदची इच्छा आहे. मात्र, नितीश यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी, अशी जदयूची भूमिका आहे. या निवडणुकीत लालू आणि मुलायम यांचे भवितव्य निश्चित होणार आहे. बिहारमध्ये भाजपचा रथ अडवल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतील. भविष्यातील निवडणूक भाजप विरुद्ध जनता परिवारात होईल.
बातम्या आणखी आहेत...