आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar Well Person For The Prime Ministership

नितीशकुमार हे पंतप्रधानपदासाठी ‘परिपूर्ण’, शत्रुघ्‍न सिन्हांचा भाजपाला घरचा आहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्याची अनेक भाजप नेत्यांना घाई झालेली असतानाच चित्रपट अभिनेते व भाजपचेच खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची तोंडभर स्तुती केली आणि नितीशकुमार हे पंतप्रधानपदासाठी ‘परिपूर्ण’ असल्याचे सांगत भाजपला जोरदार झटका दिला आहे.


पाटणा येथील जयप्रकाश नारायण विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे ‘मटेरियल’ आहेत. आज ते देशातील निवडक चांगल्या आणि यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. माजी मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि जेडीयूमध्ये सेतू साधण्याची आपली इच्छा असल्याचेही ते म्हणाले. शत्रुघ्न सिन्हा पाटणा साहेबचे भाजप खासदार आहेत. नंतर त्यांनी आपल्याच विधानावर स्पष्टीकरणही दिले. पंतप्रधानपदासाठी पात्र असलेल्या नेत्यांपैकी नितीशकुमार हे एक आहेत, असे आपणाला म्हणायचे होते. शेवटी पक्षाने निवड केली आणि निवडणुकीत पुरेसे संख्याबळ मिळाले तरच एखादी व्यक्ती पंतप्रधान बनू शकते, असे सिन्हा म्हणाले. शत्रुघ्न सिन्हा हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांच्या प्रचार चमूमध्ये सिन्हा यांना स्थान देण्यात आलेले नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेल्या विकासकामांची त्यांनी वारंवार स्तुतीही केली आहे.
नरेंद्र मोदी यांना भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार समितीचे अध्यक्षपद दिल्याने नाराज होत नितीशकुमार यांच्या जेडीयूने रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता भाजप नेत्याकडूनच नितीशकुमार यांचे गुणगान गायले जात असल्याने शत्रुघ्न सिन्हांवर पक्षाकडून कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी गेल्या आठवड्यात मोदींना लोकप्रियता मिळत असली, तरी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तेच पक्षाचे सर्वमान्य नेते आहेत, असे वक्तव्य केले होते.


भाजप अध्यक्षांचे कानावर हात
शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेल्या विधानांबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांना विचारले असता आपण सिन्हा यांचे विधान ऐकलेले नाही, असे सांगत त्यांनी कानावर हात ठेवले.


मोदींवरील टीकेमुळे प्रवक्त्याची हकालपट्टी
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टिप्पणी केल्यामुळे बिहार भाजपचे प्रवक्ते रामकिशोर सिंग यांची पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. भाजपच्या नेतृत्वातील रालोआला आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवून देण्याची नरेंद्र मोदी यांची क्षमता शंकास्पद असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती.


शॉटगन उवाच...
@ नितीशकुमार हे पंतप्रधानपदासाठी अतिशय योग्य उमेदवार आहेत. त्यांच्याशी आपले व्यक्तिश: चांगले संबंध आहेत. त्याआधारावर रालोआ आणि जेडीयूमध्ये सेतू साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
@ नितीशकुमार हे मला भावासारखे आहेत. तेही मला तेवढाच सन्मान देतात.
@ भाजपने नितीशकुमारांना सत्तापिपासू म्हणणे आणि जेडीयूने घेतलेल्या फारकतीला विश्वासघात म्हणणे आपणास पटत नाही.
@ राजकारण ही लवचिकता आणि शक्यतांची कला आहे. त्यामुळे राजकारणात कधीही काहीही होऊ शकते.
@ आज आम्ही सोबत नसलो, याचा अर्थ आम्ही उद्या सोबत असणारच नाही, असा मुळीच नाही.