आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅलेट गनवर बंदी घालण्यास काश्मीर हायकोर्टाचा नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात निदर्शकांना नियंत्रित करण्यासाठी पॅलेट गनचा वापर करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. जोपर्यंत अनियंत्रित जमाव हिंसाचार करत राहील तोपर्यंत बळाचा वापर अपरिहार्य आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

मुख्य न्यायमूर्ती एन. पॉल वसंतकुमार आणि न्यायमूर्ती अली मोहंमद मग्रेय यांनी हा निकाल दिला. यासंदर्भात काश्मीर बार असोसिएशनने याचिका दाखल केली होती. पॅलेट गनचा वापर करण्याचे आदेश देणाऱ्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटला भरण्याची मागणीही खंडपीठाने बुधवारी फेटाळली. मात्र, पॅलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना राज्यात किंवा राज्याबाहेर पुरेशी वैद्यकीय सुविधा देण्यात यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले. ‘काश्मीरमधील सध्याची स्थिती आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने २६ जुलै २०१६ रोजी पॅलेट गनला पर्याय सुचवण्यासाठी स्थापन केलेली समिती हे लक्षात घेऊन सध्यातरी पॅलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याचा आमचा विचार नाही. बेशिस्त जमाव जोपर्यंत हिंसाचार करत राहील तोपर्यंत बळाचा वापर अपरिहार्य आहे. कोणत्या वेळी कोणत्या बळाचा वापर करायचा याचा निर्णय हिंसाचार होत असलेल्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यानेच घ्यायला हवा,’ असे न्यायालयाने म्हटले आहे.
चकमकीत एक दहशतवादी ठार
बांदिपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत गुरुवारी एक दहशतवादी ठार झाला. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अरगाम या गावात दहशतवादी दडून बसले आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली. दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने चकमक उडाली. त्यात एक दहशतवादी ठार झाला. ही चकमक सुरूच होती. या दहशतवाद्याची तसेच तो कोणत्या गटाशी संबंधित आहे याची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.
घुसखोरीचे दोन प्रयत्न उधळले
पाकव्याप्त काश्मीरमधून काश्मीर खोऱ्यात घुसण्याचे दहशतवाद्यांचे दोन प्रयत्न सुरक्षा दलांनी उधळून लावले. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, उरी आणि नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरीविरोधी कारवाई सुरू असतानाच नौगाम भागातही घुसखोरीचे दोन प्रयत्न उधळून लावण्यात आले. गुरुवारी पहाटे दोन वेगवेगळ्या गटांनी घुसखोरीचा प्रयत्न केला; पण तो हाणून पाडण्यात आला. त्यामुळे घुसखोरांना माघारी परतावे लागले. उरीच्या कारवाईत आठ दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त होते, पण त्यांचे मृतदेह अद्याप हाती लागले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...